Shivraj Rakshe याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत, पैलवान चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान

| Updated on: Feb 03, 2025 | 2:14 PM

Chandrahar Patil On Shivraj Rakshe : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाला होता. शिवराजने याच रागातून पंचाची कॉलर धरली आणि लाथ मारली. शिवराजच्या या भूमिकेचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी समर्थन करत खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

Shivraj Rakshe याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत, पैलवान चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान
Chandrahar Patil On Shivraj Rakshe
Follow us on

महाराष्ट्र केसरी 2025 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामना अहिल्यानगरमध्ये पार पडला. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली. बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे झालेल्या महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने होते. मात्र महेंद्र गायकवाड याने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडलं. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. तसेच शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं 3 वर्षांसाठी निलंबन केलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर या प्रकरणावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय. या सर्व प्रकरणावरुन डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांनी शिवराजच्या भूमिकेचं स्वागत केलंय.

चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळ यांचं अभिनंदन केलं. तर शिवराज राक्षे याची पाठराखण करत त्याने पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटील सांगलीत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळेस पाटील यांनी हे टोकाचं विधान केलं आहे.

चंद्रहार पाटील काय म्हणाले?

“पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे. कारण एवढ्या कमी वयात महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं मोठी गोष्ट आहे, तो महाराष्ट्र केसरी झालाय. त्यासाठी मी त्याचं काल आणि सोशल मीडियावरुन अभिनंदन केलंय. मात्र शिवराजसोबत झालेला प्रकार हा 100 टक्के चुकीचा आहे. ही 100 टक्के चुकी कुस्तीगीर संघांची किंवा कुणा एका व्यक्तीची नाही. चुकी ही शिट्टी वाजवणाऱ्या पंचाची आहे. शिवराज राक्षे याने स्वत:ने पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे”, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या 2 कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवरुन एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. रोहित पवार यांनी शिवराजने पंचाना लाथ मारणं असमर्थनीय आहे असं म्हटलं. मात्र मल्लावर तशी वेळ काय येते? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.