मुंबई : फिफा अर्थात फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठीचं बिगुल वाजलं आहे. भारतात गेल्या काही वर्षात फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. 2022 फुलबॉल वर्ल्डकप स्पर्धेवेळी ही लोकप्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ आहे. या गटात टॉप 2 वर असलेले संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तर सौदी अरेबियात होणाऱ्या 2027 एएफसी आशियाई कपसाठी थेट प्रवेश मिळेल. पात्रता फेरीतील पहिला सामना भारत आणि कुवैत यांच्यात गुरुवारी रात्री 10 वाजता होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात कधीच प्रवेश केलेला नाही. पण या वर्षी टीम इंडियाची कामगिरी आणि कोच इगोर स्टिमकच्या मेहनतीमुळे आशा वाढल्या आहे. ग्रुपमधील तगडं आव्हान पाहता टीम इंडियाला चांगली सुरुवात करणं महत्त्वाचं आहे.
फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीसाठी 36 संघांना 9 गटात विभागलं गेलं आहे. म्हणजेच एका गटात चार संघ आहेत.भारत, कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे चार संघ आहेत. हे संघ घरच्या-बाहेरच्या मैदानावर राऊंड रॉबिन पद्धतीने खेळणार आहे. कतारचा संघ फिफा क्रमवारीत 61 व्या स्थानावर, कुवैत 136 व्या स्थानावर, अफगाणिस्तान 154 व्या स्थानावर, तर भारतीय संघ 102 व्या स्थानावर आहे. भारत आणि कुवैत यांच्यात गुरुवारी जबेर अल अहमद या आंतरराष्ट्रीय मैदानात सामना होणार आहे. त्यानंतर 6 जून 2024 रोजी हे दोन्ही संघ भारतात एकमेकांशी भिडणार आहेत.