पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत हॉकी इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. सुवर्ण पदक हुकलं असलं तरी सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेपूर्वीच गोलकीपर पीआर श्रीजेश याने निवृत्तीची घोषणा केली होती. स्पर्धेत कांस्य पदक मिळवताच त्याच्या हॉकी कारकिर्दिचा शेवटही गोड झाला. पीआर श्रीजेशने निवृत्ती घेतल्याने क्रीडारसिक भावुक झाले होते. कारण पीआर श्रीजेश एकटाच प्रतिस्पर्धी संघांना भारी पडायचा. त्याच्याकडून गोल करणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटायचा. त्यामुळे त्याची एक वेगळीच भीती प्रतिस्पर्धी संघांना असायची. पीआर श्रीजेश गोलपोस्टमध्ये उभा असला की क्रीडाप्रेमींना चिंता नसायची. पण आता श्रीजेश हॉकी मैदानात दिसणार नाही. कांस्यपदकासह त्याची हॉकी कारकिर्द संपली आहे. असं असताना त्याचा सन्मान राखत सिनिअर हॉकी संघातून जर्सी नंबर 16 रिटायर केली गेली आहे.
क्रीडाविश्वात जर्सी रिटायर करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. बीसीसीआयने 2017 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जर्सी नंबर 10 रिटायर करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 2023 मध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर केली होती. आता हॉकी इंडियाने गोलकीपर पीआर श्रीजेशला त्यांच्या पंगतीत बसवलं आहे. दुसरीकडे, माजी हॉकीपटू श्रीजेश आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीजेशकडे ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे.
An era of excellence ends as Hockey India retires the iconic No. 16 jersey of PR Sreejesh. From impossible saves to inspiring generations, Sreejesh’s legacy will forever be etched in the history of Indian hockey. 🏑🇮🇳 #IndiaKaGame #HockeyIndia #SreejeshFelicitation… pic.twitter.com/yelBLMtAAq
— Hockey India (@TheHockeyIndia) August 14, 2024
हॉकी इंडियाचे महासचिव भोलानाथ सिंह यांनी सांगितलं की, ‘श्रीजेश आता ज्युनिअर भारतीय हॉकी संघाचा कोच झाला आहे. तसेच आम्ही सिनिअर हॉकी टीममधून त्याची जर्सी नंबर 16 रिटायर केली आहे. आम्ही ज्युनिअर हॉकी संघातून जर्सी नंबर 16 रिटायर करत नाही. श्रीजेश दुसऱ्या श्रीजेशला ज्युनिअर संघासाठी तयार करेल.’ दुसरीकडे, हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशचा सन्मान केला. तसेच श्रीजेशला 25 लाखांचा धनादेश दिला आहे.
कांस्य पदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवला होता. शेवटच्या सत्रात स्पेन बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळी करत होता. पण गोलकीपर पीआर श्रीजेशने सर्व हल्ले परतावून लावले. तसेच भारताला कांस्य पदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.