पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील पहिलं मेडल जवळपास पक्कं! कसं आणि काय झालं ते जाणून घ्या

| Updated on: Jul 26, 2024 | 4:21 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेतील विविध स्पर्धांसाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. कोणता खेळाडू कोणतं पदक आणणार इथपासून चर्चा सुरु झाली आहे. असं असताना भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तीरंदाजी संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील पहिलं मेडल जवळपास पक्कं! कसं आणि काय झालं ते जाणून घ्या
Image Credit source: (Photo- Getty)
Follow us on

ऑलिम्पिक स्पर्धेचं 33वं पर्व पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील 200हून अधिक देश सहभागी झाले आहेत. भारताकडून 117 खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत. या खेळाडूंकडून टोक्यो ऑलिम्पिकपेक्षा जास्त पदकांची अपेक्षा आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एका सुवर्ण पदकासह सात पदकं मिळवली होती. आता भारतीय क्रीडारसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून हा दुहेरी आकडा व्हावा अशी इच्छा आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तीरंदाजीत भारताच्या महिला आणि पुरुष या दोन संघांनी थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे पदक जवळपास निश्चित मानलं जात आहे. ओपनिंग सेरेमनीपूर्वी भारताने तिरंदाजीत पात्रता फेरीने आपली सुरुवात केली. पात्रता फेरीत पुरुष आणि महिला संघांनी टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

महिला तीरंदाजीत अंकिता भकत, भजन कौर आणि दीपिका कुमारी यांनी चांगलं प्रदर्शन केलं. अंकिताने 666 गुण, भजन कौरने 659 आणि दीपिका कुमारीने 658 गुण मिळवले. या तिघांची एकूण बेरीज 1983 झाली आणि टॉप 4 मध्ये स्थान मिळालं. आात उपांत्य फेरीत फ्रान्स किंवा नेदरलँडशी सामना होऊ शकतो. दुसरीकडे, धीरज बोम्मादेवरा याच्या दमदार कामगिरीमुळे पुरुष तिरंदाजी संघाने 2013 गुणांसह पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकावले. आता भारतीय संघाचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर थेट उपांत्य फेरीत स्थान मिळालं की पदक पक्कं होईल.

धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या त्रिकुटाने उपांत्य फेरी गाठल्यास त्यांचा सामना इटली, कझाकिस्तान किंवा फ्रान्सशी होईल. अशा स्थितीत भारतीय पुरुष तिरंदाजी संघ टॉप-2 मध्ये पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. खरं तर या स्पर्धेत दक्षिण कोरियाचा संघ सर्वात मजबूत गणला जातो. पण यावेळी भारतीय संघ अंतिम फेरीपूर्वी दक्षिण कोरियाच्या संघाशी भिडणार नाही. त्यामुळे भारतीय पुरुष तिरंदाजी संघ अंतिम फेरी गाठू शकतो. दुसरीकडे, वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष तीरंदाजी संघाने कोरियन संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदकाची अपेक्षा वाढली आहे.