ऑलिम्पिक स्पर्धेत गेल्या काही वर्षात भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून आला आहे. 2008 पासून कुस्तीत भारताने पदक मिळवलं आहे. मागच्या 16 वर्षांपासून हे समीकरण जुळून आलं आहे. ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंनी वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे भारतात कुस्तीचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहा कुस्तीपटूंनी पदकासाठी दावा ठोकला होता. पण यापैकी फक्त अमन सहरावतच पदक मिळवू शकला. दुसरीकडे, विनेश फोगाट 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली. तर इतर चार स्पर्धक पदकाच्या शर्यतीतच पोहोचले नाहीत. कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह नाराज आहेत. यासाठी त्यांनी देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कारणीभूत धरलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पोर्टक्रीडाला दिलेल्या मुलाखतीत कांस्य पदक विजेत्या अमन सहरावतचं कौतुक केलं. पण यावेळी त्यांनी इतर कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून निराशा जाहीर केली. भारतीय कुस्ती महासंघाला कमीत कमी पाच पदकांची अपेक्षा होती. संजय सिंह यांच्या मते, कुस्तीपटू चांगल्या पद्धतीने योजना आखत होते, सर्वकाही ठीक चाललं होतं. पण बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं. त्यामुळे तयारीला कुठेतरी खीळ बसली. त्यामुळे पदकाची संधी हुकली.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. पण त्यांचं वक्तव्य विनेश फोगाटकडे इशारा करत असल्याचं दिसत आहे. विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी इतर कुस्तीपटूंसह जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. संजय सिंह यांच्या दाव्यानुसार यामुळे भारताचं चार पदकांचं नुकसान झालं. नशीबानेही भारताची साथ दिली नाही, असंही संजय सिंह यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, ऑलिम्पिक अंतिम सामन्यापूर्वी अपात्र झाल्याचं खापरही संजय सिंह यांनी विनेश फोगाटवर फोडलं. वजन नियंत्रणात ठेवणं ही वैयक्तिकरित्या कुस्तीपटूची जबाबदारी असते. विनेशने ज्या सुविधा मागितल्या त्या त्यांना दिल्या होत्या, असंही संजय सिंह यांनी पुढे सांगितलं.