ऑलिम्पिकमध्ये भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंग करणाऱ्या टीमचा हिशेब चुकता करण्याची संधी, जाणून घ्या कसं आणि कधी

| Updated on: Sep 24, 2024 | 8:21 PM

भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्यानंतर भारताने आशिया कप जिंकला आहे. आता भारतीय संघ जर्मनीचा दौरा करणार आहे. जर्मनीने भारताला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. त्यामुळे सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

ऑलिम्पिकमध्ये भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंग करणाऱ्या टीमचा हिशेब चुकता करण्याची संधी, जाणून घ्या कसं आणि कधी
Image Credit source: Twitter
Follow us on

हॉकीमध्ये पुन्हा एकदा भारताचा सुवर्णकाळ परत येत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेटव्यतिरिक्त इतरही खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण हा उत्साह ऑलिम्पिकपर्यंत मर्यादित न राहता पुढेही कायम राहावा यासाठी प्रयत्न असेल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताने आशिया चषकावर नाव कोरलं होतं. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही हे विशेष..आता भारतीय नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न जर्मनीमुळे भंगलं होतं. जर्मनीने भारताचा 3-2 ने पराभव केला होता. उपांत्य फेरीत जर्मनीने भारताला मात देत अंतिम फेरी गाठली होती. आता या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. भारतीय हॉकी संघ 23 आणि 24 ऑक्टोबरला मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये जर्मनीविरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे. जवळपास 11 वर्षानंतर दिल्लीत आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होणार आहे. मागच्या काही वर्षात ओडिशाच्या भुवनेश्वर आणि राउरकेला येथे हॉकी सामने खेळले जात आहे.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी सांगितलं की, ‘जर्मनीविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. भारत आणि जर्मनी या दोन्ही देशात हॉकीचा इतिहास आहे. त्यामुळे या मालिकेतून क्रीडारसिकांना दोन चांगल्या संघातील सामना पाहण्याची संधी मिळेल.’ दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी कर्णधाराने सांगितलं की, ‘आम्हाला या मालिकेचं यजमानपद मिळाल्याने गौरवास्पद वाटत आहे. यामुळे हॉकीला चांगलं व्यासपीठ मिळेल. तसेच दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील.’

हॉकी इंडियाचे महासचिव भोला नाथ यांनी सांगितलं की, ‘भारत आणि जर्मनी यांच्यातील सामना कायमच अतितटीचा राहिला आहे. चांगल्या संघाचा सामना करण्यासाठी आमचा संघ उत्सुक आहे. या मालिकेतून दोन्ही संघांना भविष्यातील रणनिती आखण्याची संधी मिळेल.’ नुकतंच भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत यजमान चीनचा धुव्वा उडवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. तसेच सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्य पदक मिळवलं आहे. टोक्योनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली.