भारतीय स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने आपल्या कारकिर्द थांबवत असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही घोषणा केली आहे. दीपा कर्माकर याच वर्षी आशियाई चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. तसेच रियो ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत तिचं कांस्य पदक अवघ्या काही गुणांनी हुकलं होतं. फक्त 0.15 गुण कमी पडले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दीपा कर्माकरने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाहीर केलं आहे की, ‘खूप विचारपूर्वक आणि चिंतन करून मी प्रोफेशनल जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण मला वाटतं ही योग्य वेळ आहे. जोपर्यंत मला आठवते की, जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. मी प्रत्येक क्षण पुरेपूर जगली आहे. प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. ‘ वयाच्या 31 व्या वर्षी दीपाने निवृत्ती जाहीर केली आहे.
दीपा कर्माकरने पुढे लिहिलं की, ‘मला आठवते ती पाच वर्षांची दीपा..तिला स्पष्ट सांगण्यात आलं होतं की सपाट पायांमुळे कधीच जिम्नॅस्ट होऊ शकत नाही. पण आज मला माझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो. जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणं आणि पदकं जिंकणे. सर्वात महत्त्वाच म्हणजे रियो ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्टविरुद्ध केलेली कामगिरी माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला आहे. आज दीपाला पाहून खूप आनंद वाटतो कारण तिच्यात स्वप्न पाहण्याची हिंमत होती.’
‘आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंद हा एक टर्निंग पॉईंट होता, कारण तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन.पण कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की ही विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पण मन अजूनही सहमत नाही. मी निवृत्त होत असले तरी माझा जिम्नॅस्टिकशी असलेला संबंध कधीही तुटणार नाही. मला या खेळाला काहीतरी परत द्यायचे आहे. कदाचित मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा माझ्यासारख्या इतर मुलींना पाठिंबा देईन.’, असंही दीपा कर्माकरने पुढे लिहिलं आहे.