मुंबई : क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूवर पॉक्सो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या बातमीने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. लग्नाचं आमिष दाखवत या खेळाडूने अनेकवेळा मुलीवर बलात्कार केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. ज्या खेळाडूवर आरोप झालेत अद्याप त्याची यावर कोणतीही प्रक्रिया आलेली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.
भारतीय हॉकी संघाचा वरूण कुमार असं या खेळाडूचं नाव आहे. बंगळुरूमध्ये त्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. 2019 पासून दोघे एकमेकांना ओळखत होते. पीडित अल्पवयीन असून तिने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. वरूण कुमार आणि पीडिता 17 वर्षांची असताना इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यावेळू वरूण हा SAI येथे ट्रेनिंग घेत होता. वरूण कुमार याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
वरूण कुमार हा खेळाडू हिमाचल प्रदेशमधील असून हॉकी खेळण्यासाठी तो पंजाबमध्ये गेला होता. 2017 मध्ये वरूण कुमारने टीम इंडियाकडून डेब्यू केला होता. त्यानंतर 2022 मध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. तर 2022 च्या आशियाई क्रीड स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या संघाचा तो भाग होता. आता या गंभीर आरोपानंतर ज्ञानभारती पोलीस जालंधरमध्ये आरोपी वरुणचा शोध घेत आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यावरी हिमाचल प्रदेशमधील राज्य सरकारने त्याच्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आता वरुण कुमार हा फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता आहे.