Kho Kho WC 2025 : खो-खो वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं, 13 जानेवारीपासून 24 संघ लढणार

| Updated on: Jan 03, 2025 | 8:12 PM

खो खो वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत 24 देश खेळणार आहेत. पुरुष गटात 21, तर महिला गटात 20 संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेचं स्वरुप आणि इतर सर्व बाबी..

Kho Kho WC 2025 : खो-खो वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं, 13 जानेवारीपासून 24 संघ लढणार
Follow us on

भारतीय मातीच्या खेळाला आता जागतिक पातळीवर ओळख मिळणार आहे. खो म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडू बाद करण्यासाठी धाव घ्यायची, तर प्रतिस्पर्धी खेळाडूने त्याचा चकवा देत खेळाडूंमधून मार्ग काढायचा. शक्ती आणि बुद्धीचा मेळ असलेल्या हा खेळ जागतिक पटलावर पाहण्याची एक वेगळीच पर्वणी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. पहिल्या खो खो वर्ल्डकप स्पर्धेत पुरुष गटात 21 देश आणि महिला गटात 20 देशांचा सहभाग असणार आहे. पुरुष खो खो वर्ल्डकप स्पर्धेला 13 जानेवारीपासून, तर महिला खो खो स्पर्धेला 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पुरुष विजेत्या संघाला निळी, तर महिला विजेत्या संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरी 17 आणि 18 जानेवारीला होणार आहे. अंतिम सामना 19 जानेवारीला होणार आहे.

खो-खो पुरुष गट

पुरुषांच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे संघ आशिया खंडातून असतील. तर घाना, केनिया आणि दक्षिण आफ्रिका हे देश अफ्रिका खंडातून असतील. तर युरोपमधून इंग्लंड आणि नेदरलँड्स स्पर्धेत उतरतील. कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतील. दुसरीकडे ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दक्षिण अमेरिका आणि ओशनियामधून सहभागी होतील.

खो-खो महिला गट

महिला गटात आशिया खंडातून भारत, पाकिस्तान, भूतान, इराण, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. आफ्रिका खंडातून केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा हे संघ आहेत. तर पोलंड, इंग्लंड आणि जर्मनी युरोपचे प्रतिनिधित्व करतील. पेरू आणि न्यूझीलंड अनुक्रमे दक्षिण अमेरिका आणि ओशनियामधून स्पर्धेत उतरतील. विशेष म्हणजे उत्तर अमेरिकेतील एकही संघ यंदा महिलांच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही.

कुठे पाहता येणार हा सामना ?

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. टीव्ही ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनच्या माध्यमातून ही स्पर्धा क्रीडाप्रेमींना पाहता येणार आहे. तर डिस्ने+ हॉटस्टार ओटीटीच्या माध्यमातून मोबाईलवर हे सामना पाहता येतील.