मुंबई : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा सातारा (Satara) जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे. तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. 1963 साली ही स्पर्धा साताऱ्यात झाली होती. यंदा 36 जिल्ह्यातील 45 संघ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात एकूण 900 मल्लांचा समावेश असेल. यावेळी 50 हजार प्रेक्षक बसतील एवढी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. छत्रपती शाहू स्टेडीयम (Chhatrapati Shahu Stadium) या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. या मैदानात एकूण 5 आखाडे तयार करण्यात आले आहेत. यात मातीचे 2 आणि मॅटचे 3 आखाडे असणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावण्यासाठी 6 ते 8 मल्लांना चितपट करुनच हा किताब मिळवता येणार आहे. उद्या 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहेत.
कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला असून 4 ते 9 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचं आयोजन झाल्यामुळे राज्यभरातल्या मल्लांमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
अखेरची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली होती. मॅटवर झालेल्या अंतिम फेरीत हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला होता.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरूवात 1961 साली झाली. राज्याच्या विविध भागातल्या अनेक पैलवानांनी महाराष्ट्र केसरी होऊन मानाची चांदीची गदा उंचावली आहे. भारतात कुस्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. काही भागात तर घराघरात किमान एकतरी पैलवान पहायला मिळतो. कोल्हापूरला तर कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून मल्ल कुस्तीची तयारी करण्यासाठी येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कुस्तीचे आखाडे थंड पडले होते. मात्र कुस्तीचा हा थरार पुन्हा रंगणार असल्याने पैलवानांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे.
इतर बातम्या
IPL 2022 SRH vs LSG Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, परपल कॅपमध्येही बदल