पुणे : महाराष्ट्र केसरी या मानाच्या असलेल्या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे विजेता ठरला आहे. शिवराज राक्षेने मानाची केसरी गदा पटकावली आहे. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. या अंतिम सामन्याचं आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड पुणे इथे करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती होती.
सेमी फायनलमध्ये माती विभागातून पै महेंद्र गायकवाडने पै सिंकदर शेखचा पराभव केला. तर गादी विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला.
शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होणार आहेत. विजेता आणि उपविजेत्या अशा दोघांनाही बक्षिस देण्यात येणार आहे. केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
महाराष्ट्र केसरीची गदा एकदा तरी जिंकावी, असं स्वप्न प्रत्येक पैलवानाचं असतं. मात्र ते प्रत्येकाला झेपणारं नसतं. पण कुणीकुणी पहिल्याच झटक्यात महाराष्ट्र केसरी ठरतं. अनेक पैलवान या मानाच्या गदेसाठी जंग जंग पछाडतात. मॅटवर, तालमीत शक्य तिथे रात्रंदिवस जोरदार सराव करतात. ही गदा नक्की बनते कशी, तिचं स्वरुप कसं असतं हे ही आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी गदा ही सागाच्या लाकडापासून बनवण्यात येते. या गदेवर त्यावर चांदीनी नक्षीकाम केलं जातं. या नक्षीकामासाठी चांदीचा 28 गेज पत्रा वापरण्यात येतो. गदेचे वजन जवळपास 8 ते 10 किलो इतकं असतं. गदेची उंची ही साधारण 27 ते 30 इंच असते. गदेचा व्यास हा 9-10 इंच असतो. या गदेवर एका बाजूला हनुमानाचे चित्र असतं. तर दुसऱ्या बाजूस कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असतं.