भारतात असे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण न मिळाल्याने मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना पैशांसोबत ओळखही मिळाली. तसेच आयपीएलमुळे आणि त्यांच्यातील प्रतिभेच्या जोरावर अनेक खेळाडूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली. काही वर्षांपर्यंत भारतात फक्त क्रिकेट नि क्रिकेटच होतं. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांना प्राधान्य नव्हतं, किंवा क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळ पाहिले जात नव्हते. मात्र हे चित्र बदललंय. कुस्ती असो किंवा फुटबॉल या खेळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतातील क्रीडा चाहत्यांची बदललेली मानसिकता आणि मिळणाऱ्या पाठींब्यामुळे आता अनेक खेळाडू फुटबॉल आणि इतर खेळाकडे वळले आहेत.
भारत क्रिकेटसह इतर खेळांमध्येही महासत्ता व्हावा, यासाठी अनेक प्रशिक्षण शिबिरं राबवली जात आहे. अनेक दिग्गज आजी माजी खेळाडू उद्याच्या नव्या पिढीला मार्गदर्शन करतायत. तरुणांसह तरुणींनी खेळाकडे यावं, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अशाच प्रशिक्षण कार्यक्रमातून उद्याचे खेळाडू तयार होत आहेत. अशाच एका फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रमात एका छोट्या खेड्यातील मुलींनी सहभाग घेऊन आपली छाप सोडली. छोट्या शहरातील पर्यायाने ग्रामीण भागातील मुली त्यांना योग्य संधी प्रशिक्षण मिळाल्यास काय करु शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं.
जयपूर येथे राजस्थान युनायटेड फुटबॉलच्या पाठिंब्याने राजस्थान फुटबॉल असोसिएशनने राज्यस्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने पार पडले. धेंगसरी या छोट्या शहरातील 14 मुलींच्या ग्रुपने या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. मुलींनी भाग घेऊन आपली प्रतिभा दाखवली आणि उपस्थितांची मनं जिंकली. तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी नीरज के पवन यांचंही लक्ष वेधलं. नीरज के पवन हे गेली अनेक वर्ष महिला सशक्तीकरणासाठी वकिली करत आहेत. त्या 14 मुलींच्या गटातून मंजू राजपूत हीची जर्मनीत होणाऱ्या 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
माणसाचा दृढनिश्चिय, जिद्द, परिश्रम आणि चिकाटी हे गुण असले की तो कुणाचाही विचार न करता, काहीही करु शकतो, हे आपण अनेकदा पाहिलंय. या मुलींबाबतही तसंच होतं. या मुलींच्या प्रतिभेवर संशय घेण्यात आला, यांना जमेल का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र मुलींनी प्रतिभेवर संशय घेणाऱ्यांना तोंडघशी पाडत विजयाचा झेंडा फडकवला.
ज्युलिया फारर यांनी या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली. त्यांनी या 14 मुलींच्या गटाचा खेळ पाहिला. ज्युलिया यांनी या मुलींच्या गटाचं आणि प्रामुख्याने मंजू राजपूत हीचं कौतुक केलं. ज्युलिया या जर्मन फुटबॉल शिक्षक आणि बोरुसिया डॉर्टमुंड या प्रख्यात जर्मन फुटबॉल क्लबच्या एशिया पॅसिफिकच्या प्रमुख आहेत.
क्रीडा सचिव या पदावर कार्यरत असलेले नीरज के पवन यांनी मंजू राजपूतला खास डिझाइन केलेली जर्सी भेट दिली. तसेच पवन यांनी या युवा खेळाडूंचं अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “या मुली किती पुढे आहेत, हे पाहणं आनंददायक आहे. मुलींचा हा इथवरचा प्रवास ही त्यांचा कठोर परिश्रमाची आणि संघर्षाची पोचपावती आहे” असं नीरज के पवन यांनी म्हटलं.
रोशनी टंक यांनी या 14 मुलींच्या गटाचं अभिनंदन केलं. तसेच भविष्यात राजस्थानमधील महिला खेळाडू अशीच भरीव कामगिरी करुन राज्यासह देशाचं नाव उंचावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोशनी टंक या राजस्थान फुटबॉल असोसिएशनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. रोशनी टंक यांनी महिलांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. टंक यांनी राजस्थानमध्ये अनेक खेळांचं आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राजस्थान युनायटेड फुटबॉल क्लबचे अध्यक्ष डॉ के के टाक यांनी सर्व पार्श्वभूमीतील इच्छुक खेळाडूंना आवश्यक त्या सर्व गोष्टी (कीट) आणि कोचिंगचं महत्त्व स्पष्ट केलं.
कौशिक मौलिक यांनी या खेळाडूंना प्रोत्साहित केलं. तसेच स्थानिक पातळीवरील स्पर्धेचं ओयजन हे खेळाडूंना कशाप्रकारे जागितक पातळीवर पोहचवण्यासाठी निर्णायक ठरतात, याचं महत्त्व अधोरिखेत केलं. कौशिक मौलिक हे वरिष्ठ सल्लागार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नुकत्याच झालेल्या म्युनिक जर्मनीच्या भेटीनंतर हा उपक्रम हाती घेण्यात आला. या भेटीत जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शर्मा यांना राजस्थानमध्ये फुटबॉलला चालना देण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. यामध्ये तरुण फुटबॉलपटूंना प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे कार्यक्रम आयोजित करणं आणि सपोर्ट नेटवर्क स्थापन करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे.