‘कदाचित माझी चुक असावी…’, खेळरत्न पुरस्कार वादावर मनु भाकर म्हणाली..

| Updated on: Dec 24, 2024 | 6:26 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खऱ्या अर्थाने मनु भाकरने गाजवली. एक नाही तर दोन पदकं जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली. शूटिंगमध्ये मनु भाकरने दोन कांस्य पदक मिळवत इतिहास रचला होता. पण ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराच्या यादीत मनु भाकरचं नाव नाही. मनु भाकर यावर व्यक्त झाली आहे.

कदाचित माझी चुक असावी..., खेळरत्न पुरस्कार वादावर मनु भाकर म्हणाली..
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकापाठोपाठ एक निराशा हाती पडत असताना मनु भाकरने अचूक निशाणा साधला. तसेच भारताच्या पारड्यात एक नाही तर दोन पदकं टाकली. तिच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशात तिच्या नावाची चर्चा होती. कारण एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली. तिच्या कामगिरीचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं होतं. पण या वर्षी दिल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराच्या यादीत मनु भाकरचं नाव नसल्याचा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच वादाला नवी फोडणी मिळाली आहे.म नुच्या वडिलांनी या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देत सांगितलं की, मनुने पुरस्कारासाठी अर्ज दिला होता मात्र समितीकडून कोणतंच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर सारवासारव करत अजून अंतिम यादी येणं बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर खेळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मनुने खेळरत्न पुरस्कारासाठी अर्जच दिला नव्हता. हा सर्व वाद होत असताना नेमबाज मनु भाकर व्यक्त झाली आहे. तसेच आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे.

नेमबाज मनु भाकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत लिहिलं की, ‘सर्वात प्रतिष्ठित खेळरत्न पुरस्कारासाठी माझ्या नामांकनावरून जे काही सुरु आहे त्यावर मी इतकं सांगू इच्छिते की, एक खेळाडू म्हणून मला आपल्या देशासाठी खेळायचं आहे आणि चांगली कामगिरी करायची आहे. पुरस्कार आणि ओळख मला प्रेरित करते. पण ते माझं ध्येय नाही. नामांकन अर्ज करताना माझ्याकडून कदाचित चूक झाली असेल आता ते व्यवस्थित केलं जात आहे. पुरस्काराशिवाय मी आपल्या देशासाठी अधिक मेडल जिंकण्यासाठी आग्रही असेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हे प्रकरण आणखी चिघळू नका.’

मनु भाकरने या पोस्टशिवाय एबीपी न्यूजशी चर्चा करताना सांगितलं होतं की, ‘खेळरत्न हा खूप मोठा पुरस्कार आहे. तो मिळणं हा सन्मान असेल. त्यामुळे थोडंफार दु:ख वाटलं आहे. पण मला आा क्राफ्टवर काम करायचं आहे. स्पोर्ट माझं ध्येय आहे. एक नागरिक आणि एक खेळाडू म्हणून कर्तव्य आहे. जितकं शक्य तितकी मेहनत करेन, मेडल्स जिंकेन. मी यावर्षी आशा केली होती की, पुरस्कार मिळेल पण अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. पण जे काही होईल त्यासाठी मी सकारात्मक असेल.’