Paris Olympics 2024: मनू भाकर हीची फायनलमध्ये धडक, भारताला पदकाची आशा

| Updated on: Jul 27, 2024 | 6:24 PM

Summer Olympics 2024: भारतीय चाहत्यांसाठी पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच आनंदाची बातमी आली आहे. स्टार महिला नेमबाज मनू भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Paris Olympics 2024: मनू भाकर हीची फायनलमध्ये धडक, भारताला पदकाची आशा
manu bhaker women 10m air pistol final
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताची स्टार महिला नेमबाज मनु भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली आहे. मनुने ते करुन दाखवलं जे पुरुषांनाही जमलं नाही. मनुआधी भारताच्या पुरुषांना या प्रकारात पुढे जाण्यात अपयस आलं. मात्र मनुने अचूक निशाणा लावून पुढील फेरीत धडक मारली आहे. मनूने यासह मेडलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यामुळे आता भारतीयांना मनुकडून पदकाची आशा वाढली आहे. टॉप 8 मध्ये नेमबाजांनी अंतिम फेरीत जाण्यात यश मिळवलंय. मनूने 580 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आणि अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला.

मनू आणि इतर खेळाडूंना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 6 सीरिज खेळाव्या लागल्या. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात शानदार सुरुवात केली. मनू या 6 पैकी पहिल्या 3 सीरिजमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली. तर दुसऱ्या बाजूला भारताची दुसरी नेमबाज रिदीमा सांगवान हीची 24 व्या स्थानी घसरण झाली. मनूची चौथ्या सीरिजमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मनुने पहिल्या 3 मालिकांमध्ये अनुक्रमे 97,97 आणि 98 असे गुण मिळवले. त्यानंतर मनुने चौथ्या सीरिजमध्ये 98 गुणांची कमाई केली. तर रिदीमाने कमबॅक करत 24 वरुन 16 व्या स्थानी झेप घेतली.

मनू भाकर फायलनमध्ये

मनुने पाचव्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवले. तर सहाव्या आणि शेवटच्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवत फायनलमधील स्थान सुनिश्चित केलं. मनुने अशाप्रकारे सहा सीरिजमध्ये अनुक्रमे 97,97,98, 98,96 आणि 96 असे एकूण 580 पॉइंट्स मिळवले. तर रिदीमा सांगवान 15 व्या स्थानी राहिल्याने तीचं आव्हान इथेच संपुष्टात आलं. रिदीमाने सहा सीरिजमध्ये 573 पॉइंट्स मिळवले. पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यसाठी पहिल्या 8 मध्ये असणं आवश्यक होतं. मात्र त्यात रिदीमाला अपयश आलं. दरम्यान आता भारतीयांना मनुकडून सुवर्ण पदकाची आशा आहे. या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील पुढील फेरीतील सामना हा रविवारी 3 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.