पान सिंह तोमर या सिनेमात इरफान खान मुख्य भूमिकेत होता, ज्याने मध्यप्रदेशमधील एका गावात बंडखोर होत वचपा घेतला. पान सिंह तोमर बंडखोरीआधी भारतीय सैन्यात होते. पान सिंह तोमर यांनी देशाच्या संरक्षणासाठी अनेकदा शस्त्रांचा वापर केला. पान सिंह तोमर यांनी सैन्यात असताना खेळाची हौस जोपासली आणि आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पान सिंह तोमर यांच्याप्रमाणे भारतीय सैन्यात आज असाच एक सैनिक आहे, ज्याने देशांचं नाव उंचावलंय. आपण वाचतोय ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा सूपुत्र अविनाश साबळे याच्याबाबत. पान सिंह तोमर आणि अविनाश या दोघांमधील साम्य म्हणजे तो 3 हजार मीटर स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करतोय. धावपटू अविनाश देशाला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यासाठी सज्ज आहे.
प्रत्येक खेळाडूची यशाची व्याख्या वेगळी असते. क्षेत्र कोणतंही असोत, त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्या अंगी ध्येय, जिद्द, चिकाटी, खिलाडुवृत्ती, परिश्रम हे गुण असायलाच हवेत. त्यातही सातत्यता हा सर्वात मोठा गुण. अविनाशने शालेय जीवनपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचेपर्यंत सातत्यात कोणताही खंड पडू दिला नाही, हेच त्याच्या यशाचं गमक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यसाठी काही किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो, अशीच स्थिती अविनाशची होती. अविनाशचं घर आणि शाळा यातील अंतर हे जवळपास 6 किमी इतकं होतं. अविनाश शाळेत धावत तसेच पायी जायचा. अविनाश शाळेनिमित्त दररोज 12 किमी चालायचा/धावायचा. अविनाशमधील खरा धावपटू इथेच जन्मला.
अविनाशने खडतर परिस्थितीवर मात करत 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. अविनाश त्यानंतर भारतीय सैन्यात दाखल झाला. मात्र अविनाशने इथेही देशसेवेसह आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला. मात्र अविनाशचा अॅथेलिट होण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अविनाशने सियाचीन आणि पश्चिम राजस्थान या अवघड आणि आव्हानात्मक ठिकाणी सेवा बजावली. अविनाशने इथूनच हळुहळु अॅथेलिटिक्सच्या दिशेने प्रवास सुरु केला. अविनाशने त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही.
अविनाशने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. अविनाशचा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करणं हा शिरस्ताच झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या अध्यायाची सुरुवात 2018 साली नॅशनल ओपन चॅम्पियनशी स्पर्धेतून झाली. अविनाशने तेव्हा गोपाळ सैनी यांचा 37 वर्षांआधीचा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला. अविनाशने 3 हजार मीटर अंतर हे 8 मिनिटं 29.80 सेकंदात हे पूर्ण केलं आणि नॅशनल रेकॉर्ड केला. अविनाशने इथूनच रेकॉर्ड ब्रेक करण्याची मालिका सुरु केली. अविनाशने पॅरिसमध्ये डायमंड लीगमध्ये 8:09.94 मिनिट इतक्या वेळे नॅशनल रेकॉर्ड केला. अविनाशने 2018 पासून ते आतापर्यंत एकूण 10 वेळा आपलाच रेकॉर्ड ब्रेक करत स्टीपलचेस या प्रकारात ठसा उमटवला आहे.
अविनाश आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे. अविनाशची ऑलिम्पिकची ही दुसरी वेळ आहे. अविनाशने 2020 टोकियो ऑलिम्पिकमधून पदार्पण केलं. अविनाश तेव्हा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. मात्र त्यानंतरही अविनाशने आपली छाप सोडली. त्याने सातवं स्थान पटकावलं आणि नॅशनल रेकॉर्ड केला. अविनाश अंतिम फेरीसाठी पात्र न ठरणाऱ्यांपैकी सर्वात वेगवान धावपटू ठरला होता.
अविनाशने त्याच्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं पदक हे बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022मधून पटकावलं. अविनाशने तेव्हा रौप्य पदक मिळवलं. अविनाश कॉमनवेल्थ गेम्समध्ये 1994 नंतर केनियानंतर रौप्य पदक मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला. अविनाशने त्यानंतर एशियन गेम्समध्ये डबल धमाका केला. सुवर्ण कामगिरी केल्यानंतर अविनाशने 5 हजार मीटर स्पर्धेत सिलव्हर मेडल मिळवलं. अविनाशकडून आता पॅरिस ऑलिम्पिकमधून अशाच दमदार कामगिरीची आशा साऱ्या भारतीयांना आहे.