Paris Olympic : भारतीय हॉकी संघातील दिग्गज गोलकीपरची स्पर्धेपूर्वीच निवृत्तीची तारीख जाहीर, स्पष्टच सांगितलं की..

| Updated on: Jul 22, 2024 | 3:56 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारताकडून 117 खेळाडूंचा चमू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय चमूकडून यंदा मेडलच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. असं असताना भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेशने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Paris Olympic : भारतीय हॉकी संघातील दिग्गज गोलकीपरची स्पर्धेपूर्वीच निवृत्तीची तारीख जाहीर, स्पष्टच सांगितलं की..
Follow us on

भारतीय हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 1980 नंतर पहिल्यांदाच पदक मिळवून दिलं होतं. इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पदक मिळाल्याने आता अपेक्षा वाढल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघातून सुवर्ण पदकाची आशा आहे. असं असताना अनुभवी गोलकीपर आणि भारताचा माजी हॉकी कर्णधार पीआर श्रीजेश याने निवृत्तीची घोषणा केली आहे.  तसेच पदकाचा रंग बदलण्याची इच्छाही जाहीर केली आहे. त्याच्या हॉकी कारकिर्दितील पॅरिस ऑलिम्पिक ही शेवटची स्पर्धा असणार आहे.  श्रीजेशच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने 2016 मध्ये रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा भारतीय संघ आठव्या स्थानावर होता. त्यामुळे बरीच टीका झाली होती. मात्र चूक 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत सुधारली. 2020 टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला कांस्य पदक मिळवून देण्याचा सिंहाचा वाटा उचलला. श्रीजेश भारतासाठी आतापर्यंत 328 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

हॉकी इंडियाच्या पत्रकार परिषदेत श्रीजेशने सांगितलं की, “मी पॅरीसमध्ये माझ्या शेवटच्या स्पर्धेची तयारी करत आहे. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा अभिमान वाटतो आणि त्याच आशेने पुढे जात आहे. हा प्रवास खूपच अभिमानास्पद राहिला. या प्रवासात कुटुंब, सहकारी, चाहते आणि हॉकी इंडियाकडून भरपूर प्रेम मिळालं. यासाठी मी त्यांचा कायम ऋणी असेन. माझ्यावर विश्वास ठेवल्याने त्यांचा आभारी आहे. माझ्या कठीण प्रसंगी माझ्यासोबर उभे राहिले. आम्ही पॅरिसमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करू इच्छितो. आमची इच्छा या पदकाचा रंग बदलण्याची आहे.”

“टोक्यो 2020 मध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकणं हे एका स्वप्नासारखं होतं. अश्रू, आनंद आणि अभिमान हे सर्व त्यावेळी अनुभवलं.”, असंही श्रीजेशने पुढे सांगितलं. श्रीजेशने 2010 वर्ल्डकप स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये आशियाई खेळात सुवर्ण आणि जकार्ता पालेमबांगमध्ये 2018 एशियाडमध्ये कांस्य पदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीजेशने 1980 नंतर म्हणजेच 40 वर्षांनी हॉकीला कास्य पदक मिळवून देण्याचा सिंहाचा वाटा उचलला होता. अतितटीच्या सामन्यात गोल अडवल्याने भारताला विजय मिळवता आला होता.