कुस्तीपटू विनेश बाहेर होताच या खेळाडूला मिळालं सुवर्ण पदक, फोगाटचा उल्लेख करत म्हणाली…

| Updated on: Aug 08, 2024 | 6:20 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या 100 ग्रॅम वजनासाठी तिला बाद करण्यात आली आहे. त्यामुळे सुवर्णपदकाची असलेली आशा संपुष्टात आली आहे. आता कुस्तीतलं सुवर्णपदक दुसऱ्या स्पर्धकाच्या गळ्यात पडलं आहे. त्यानंतर त्या स्पर्धकाने विनेश फोगाटबाबत मोठं विधान केलं आहे.

कुस्तीपटू विनेश बाहेर होताच या खेळाडूला मिळालं सुवर्ण पदक, फोगाटचा उल्लेख करत म्हणाली...
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटने भाग घेतला होता. उपांत्य फेरीतपर्यंत विनेश फोगाटची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. दिग्गज कुस्तीपटूंना धोबीपछाड देत विनेशने अंतिम फेरी गाठली. पदक पक्कं असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. मात्र अंतिम फेरीचा सामना होण्यापूर्वी वाईट बातमी समोर आली. विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचं स्पष्ट झालं आणि तिला बाद करण्यात आलं. त्यामुळे या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना अमेरिकेच्या सारा एन हिल्डेब्राँट आणि क्युबाच्या युस्नेलिस गुजमॅन लोपेज यांच्यात खेळला गेला. यात अमेरिकेच्या साराने गुजमॅनला धोबीपछाड दिला आणि सुवर्ण पदकाची कमाई केली. सुवर्ण पदक मिळाल्यानंतर साराने विनेश फोगाटबाबत मोठं विधान केलं.

विनेश फोगाटसोबत जे काही झालं त्याची जराही कल्पना नव्हती, असं सारा एन हिल्डेब्राँटने सांगितलं. सारा एन हिल्डेब्राँट म्हणाली की, ‘काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं होतं. पण असं काही घडेल याची अपेक्षा नव्हती. विनेश वजन करण्यासाठी तिथे नव्हती. तेव्हाच माझ्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येत होते. तेव्हा आम्हाला बातमी मिळाली की तिने वजन केलं नाही. तेव्हा आम्हाला वाटलं की ती सामना करणार नाही. त्यामुळे आम्ही आनंद साजरा केला. एका तासानंतर त्यांनी सांगितलं की तू ऑलिम्पिक जिंकलं नाही. तेव्हा मी विचार करू लागली ही काहीतरी विचित्र आहे.’

सारा एन हिल्डेब्राँटने 2022 मध्ये 55 किलोवरून 50 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निश्चय केला होता. याबाबत सारा एन हिल्डेब्राँट म्हणाली की, ‘वजन कमी करण्यासाठी योग्य माहिती आणि शिस्त लागते. मी 2022 च्या शेवटी वजन कमी करण्यास सुरुवात केली. मला माहिती होतं की, मी आतापासून जे काही करेन त्याचा फायदा मला 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत होईल.’

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचं स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे. त्यात तिने लिहिलं आहे की, ‘आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली आणि मी हारले. माफ कर. तुझं स्वप्न आणि हिम्मत सर्व काही भंगलं आहे. यापेक्षा जास्त ताकद आता नाही राहिली. अलविदा कुस्ती 2001-2024.’ कुस्तीपटू विनेश फोगाटचं हे तिसरं ऑलिम्पिक वर्ष होतं. दोनदा तिने उपांत्य फेरी गाठली होती.