पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. 26 जुलैला या स्पर्धेचा शुभारंभ होईल. त्यानंतर पदक मिळवण्यासाठी जगभरातील खेळाडूंची चढाओढ सुरु आहे. क्रीडारसिकांना 11 ऑगस्टपर्यंत विविध खेळांचा आनंद लुटता येणार आहे. दुसरीकडे, पॅरिसमध्ये खेळाडूंच्या खानपानाची विशेष सोय करण्यात आली आहे. खेळाडूंच्या आवडी निवडी आणि भौगोलिक स्थितीचा आढावा घेऊन खास मेन्यू तयार करण्यात आला आहे. खेळाडूंच्या तब्येतीची काळजी घेऊनच पदार्थांची निवड केली गेली आहे. असं असताना चिकन नगेट्स मात्र या मेन्यूतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे चिकन खाताच येणार नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भारतीय खेळाडूंसाठी आनंदाची बातमी म्हणजे मेन्यूमध्ये बटर चिकन, बिर्याणी या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश केला गेला आहे. दोन्ही पदार्थ भारतात नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. भारतीय खेळाडू इतर अन्नपदार्थ खाऊन आजारी पडू नये यासाठी काळजी घेतली गेली आहे.
भारतीय दलाच्या मुख्य आहारतज्ज्ञ आराधना शर्मा यांनी रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत खेळगावच्या मेन्यूबाबत सांगितलं. मेन्यू चार भागात विभागला गेला आहे. या भारतीय उपखंडासह इतर देशांचा विचार केला गेला आहे. “वेज बिर्याणी, बटर चिकन, कॉलिफ्लॉवर करी आणि पनीर डीश असणार आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्याची चव चाखता येईल. रोज नाही पण कधीतरी खेळाडू हे पदार्थ खाऊ शकतील.”, असं आराधना शर्मा यांनी सांगितलं.
चार मिशेलिन स्टार असलेले शेफ खेळाडूंना खाद्यपदार्थ तयार करून देतील. माहितीसाठी, उत्तम दर्जाचे घटक वापरणाऱ्या रेस्टॉरंट्सना एक मिशेलिन स्टार दिला जातो. विशिष्ट चवी असलेले पदार्थ तयार करण्याचं सातत्य राखलं जातं. त्यामुळे खेळगावमधील रेस्टॉरंटमध्ये आतापासून ऑर्डर सुरु झाल्या आहे. ग्रेट ब्रिटनने 50 हजार टी बॅग्स ऑर्डर केल्या आहेत. तर कोरियाने किमचिस मागवलं आहे. तर चायनाने चिकट राईस आपल्या खेळाडूंसाठी मागवला आहे. त्याचबरोबर जपानच्या पथकासाठी स्किवर्स हा पदार्थ असणार आहे.