पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. हॉकी टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील सामन्यात पराभव झाला आहे. जर्मनीने टीम इंडियावर 3-2 ने मात करत फायनलमध्ये धडक दिली आहे. हॉकी टीम इंडियाचं या पराभवासह 44 वर्षांपासून अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आहे. मात्र टीम इंडियाला कांस्य पदकाची संधी आहे. त्यामुळे हॉकी टीम इंडियाकडे शेवट गोड करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सुवर्ण पदकासाठी अंतिम फेरीत आता नेदरलँड्स विरुद्ध जर्मनी असा सामना होणार आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने पहिल्या सत्रातील सातव्या मिनिटाला गोल करत 1-0 अशा फरकाने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाने जोरदार लढत देत जर्मनीला गोल करण्यापासून रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे आघाडी कायम ठेवत पहिलं सत्र आपल्या नावे केलं.
जर्मनीने दुसऱ्या सत्रातील तिसऱ्या मिनिटाला गोल करत 1-1 ने बरोबरी केली. जर्मनीसाठी गोंजालो याने गोल केला. जर्मनी हाच आक्रमक पवित्र पुढेही कायम ठेवला. जर्मनीसाठी 27 व्या मिनिटाल क्रिस्तोफर याने गोल केला. जर्मनीने यासह 2-1 अशी आघाडी घेतली आणि टीम इंडियाला पछाडलं. जर्मनीने अशा प्रकारे दुसरं सत्र आपल्या नावावर केलं. तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. सामन्यातील 36 व्या मिनिटाला सुखजित सिंह याने गोल केला आणि भारताला 2-2 ने बरोबरीत आणलं. त्यानंतर तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून एकही गोला आला नाही. त्यामुळे तिसऱ्या सत्राचा शेवट हा 2-2 अशा बरोबरीने झाला.
हॉकी टीम इंडियाचा पराभव
We go again day after 💪🏼
Our team gave it all today and will be back stronger for our Bronze Medal match. Let’s #Cheer4Bharat #JeetKiAur | #IndiaAtParis24 pic.twitter.com/F4C8ymFQxL— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2024
चौथ्या आणि शेवटच्या सत्रात भारतीय खेळाडूंनी जर्मनीला आघाडी घेण्यापासून रोखण्यासाठी चांगलीच झुंज दिली. जर्मनीला गोल करण्यापासून रोखलं. मात्र जर्मनीने 54 व्या मिनिटाला अखेरच्या क्षणी आघाडी घेण्यात यश मिळवलं. जर्मनीसाठी मार्को याने गोल करत 3-2 अशा फरकाने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र टीम इंडियाच्या प्रयत्नांना यश मिळालंन नाही. जर्मनीने अशाप्रकारने 3-2 ने सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
दरम्यान टीम इंडियाने साखळी फेरीत 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला. भारताने 1 सामना हा गमावला तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-2 फरकाने विजय मिळवला. अर्जेंटीना विरुद्धचा सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. आयर्लंडवर 2-0 एकतर्फी फरकाने मात केली. चौथ्या सामन्यात बेल्जियमने 1-2 ने पराभूत केलं. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कांगारुंना 3-2 ने लोळवलं. त्यानंतर उपांत्य पूर्व फेरीत टीम इंडिया-ग्रेट ब्रिटन सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. टीम इंडियाने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला.