पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. चार वर्षांनी येत असलेल्या या स्पर्धेसाठी खेळाडूंनी चांगलीच मेहनत घेतली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कोणता देश वरचढ ठरणार? कोणता खेळाडू चांगली कामगिरी करणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील मेन्यू चर्चेचा विषय ठरला आहे. कारण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या मेन्यूतून चिकन नगेट्सला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याच चिकन नगेट्समुळे धावपटू उसेन बोल्टला या फायदा झाला होता. 2008 बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान उसेन बोल्टने दहा दिवसात 1000 मॅकडॉनाल्ड चिकन नगेट्स खाल्ले होते. बोल्टने याबाबतची माहिती ‘द फास्टेट मॅन अलाईव्ह’ या आत्मचरित्रात लिहिलं आहे. पण आता त्याचा आवडता पदार्थ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद झाला आहे. त्याच्या ऐवजी खेळाडूंना खेळगावमध्ये मिशेलिन पदार्थ आणि वनस्पती आधारित मास दिलं जाणार आहे. सोया आधारित नगेट्स पर्याय म्हणून ऑफर दिले जाणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत निरोगी वातावरण तयार करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
पॅरिसमधील खेळ गावात खेळाडूंना नव्याने बांधण्यात आलेल्या 3500 क्षमता असलेल्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आस्वाद लुटता येणार आहे. बुफे काउंटरही या ठिकाणी लावण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये खेळाडू विविध प्रकारचे स्नॅक्स, बेकरी आणि मिशेलिन पदार्थांची निवड करू शकतात. खाद्य आणि पेय व्यवस्थापनाचे प्रमुख फिलिप वुर्झ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वुर्झ यांनी सांगितलं की, दिवसाला 1200 मिशेलिन डिशेस दिल्या जातील. यात 30 टक्के मेन्यू हा वनस्पती आधारित असणार आहे.’ हा आरोग्यदायी मेन्यू असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मॅकडोनाल्ड नाही, चिकन नगेट्स नाही. फक्त आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ असतील.’, असं वुर्झ यांनी सांगितलं.
‘जगभरातील खेळाडू जेव्हा रेस्टॉरंटमध्ये येतील तेव्हा फक्त भव्यता पाहून आश्चर्य वाटायला नको. तर त्यांना जेवण आणि त्याची गुणवत्ता पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं पाहीजे.’ असंही वुर्झ यांनी पुढे सांगितलं. ऑलिम्पिक स्पर्धेचं हे 33वं पर्व असून पॅरिसमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अवघ्या काही तासात या स्पर्धेला सुरुवात होणार असून संपूर्ण तयारी झाली आहे.