पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. हॉकी टीम इंडियाने पूल बीमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह या विजयाचा हिरो ठरला. हरमनप्रीतने दोन्ही गोल केले. टीम इंडियाने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाचा अशाप्रकारे हा या स्पर्धेतील 3 सामन्यातील दुसरा विजय ठरला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर हॉकी संघाचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तर आयर्लंडला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा परतीचा प्रवास जवळपास निश्चित झाला आहे.
टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडी कायम राखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर आयर्लंडला खातंही उघडता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने 1-1 असं करुन 2 गोल केले आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. भारतासाठी हरमनप्रीत याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. हरमनप्रीनेच दोन्ही गोल केले आणि विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. टीम इंडियाला या विजयासह बी ग्रुप रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. भारताने 7 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना हा बरोबरीत राहिला. भारताने सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 ने मात केली. त्यानंतर अर्जेेंटीना विरुद्ध 1-1 ने सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवंल. तर त्यानंतर आता आयर्लंडला हरवलं. भारताचा चौथा सामना हा 1 ऑगस्ट रोजी बेल्जियम विरुद्ध होणार आहे. तर पाचवा आणि शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.
चक दे इंडिया
FT:
A good win today against Ireland.
2 smashing goals from Harmanpreet Singh one via a Stroke and one from Penalty Corner.
A nearly perfect game from Team India with no goals conceded in the game.
Strong performance from the defence and the wall Sreejesh.This win… pic.twitter.com/KEh0akUzCI
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2024
कॅप्टन हरमनप्रीत याने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली. हरमनप्रीतने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात गोल केले. हरमनप्रीतने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 1 गोल केला. तसेच अर्जेंटिना विरुद्ध निर्णायक क्षणी केलेल्या गोलमुळे भारताला सामना बरोबरीत राखण्यात यश आलं. तर आयर्लंड विरुद्ध 2 गोल केले. हरमनप्रीतने अशाप्रकारे 3 सामन्यात 4 गोल करत विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.
दरम्यान आयर्लंडचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. आयर्लंडने अशाप्रकारे पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली. आयर्लंडचं या सलग तिसऱ्या पराभवासह या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्ठात आलं आहे.