भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधील 12 वा (7 ऑगस्ट) दिवस हा वाईट बातमी घेऊन आला. भारताची महिला पैलवान विनेश फोगाट ही वाढीव वजनामुळे अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळे भारतीयांना झटका लागला. विनेशने मंगळवारी 50 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत विजय मिळवून रौप्य पदक निश्चित केलं होतं. विनेशचा बुधवारी अंतिम (सुवर्ण पदक) सामना होणार होता. मात्र त्याआधी विनेशचा कमाल वजनापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विनेशला अपात्र करण्यात आलं. त्यामुळे विनेशने जिंकलेलं रौप्य पदकही तिला मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीयांसाठी हा मोठा धक्का होता.
विनेशने आपल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह वजन कमी व्हावं, यासाठी शक्य ते प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही विनेशचं वजन हे 100 ग्राम जास्तच राहिलं. विनेशच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आवश्यक ते उपचार करण्यात आले. तेव्हा भारतीय ऑलिम्पिक महासघांच्या प्रमुख पीटी उषा यांनी विनेशची भेट घेतली. आयओएने विनेश-पीटी उषा यांचा भेटीचा फोटोही प्रसिद्ध केला. त्यानंतर कुस्तीचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहीया आणि मंजीत राणी यांनीही विनेशची भेट घेतली. प्रशिक्षकांनी विनेशसह चर्चा केली. विनेशने यावेळेस अपात्र ठरवण्यावरुन पहिली प्रतिक्रिया दिली. विनेशने त्यांच्यासह चर्चेत काय म्हटलं याची माहिती कोच दहीया यांनी दिली.
या कारवाईमुळे टीम इंडियाला धक्का लागला आहे. मुली या निर्णयानंतर निराश होत्या. आम्ही विनेशला भेटलो आणि तिला धीर दिला. ती फार धाडसी आहे. विनेश आम्ही म्हणाली की, आपलं दुर्देव आहे की आपण पदकाची संधी गमावली मात्र हा खेळाचा भाग आहे.
विनेश हीने वर्ल्ड नंबर 1 असलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमधील जपनाची सुवर्ण पदक विजेती युई सुसाकी हीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेश ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहचणारी पहिलीच महिला भारतीय ठरली होती. विनेशने या विजयासह पदक निश्चित केलं होतं. मात्र 7 ऑगस्टच्या सकाळी विनेशचं अधिक वजन असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.