पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताला या स्पर्धेतील एकूण सहावं तर कुस्तीतलं पहिलंवहिलं पदक मिळालं आहे. भारताचा 21 वर्षीय युवा पैलवान अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. अमनने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याच्यावर एकतर्फी विजय मिळवला. अमनने डेरियन क्रूझवर 13-5 अशा फरकाने विजय मिळवला. अमन सेहरावत याने अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 9 ऑगस्टचा शानदार शेवट केला. अमनच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
या 5 मिनिटांच्या सामन्यात सुरुवातीला पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझ याने आघाडी घेतली. मात्र अमनने कमबॅक केलं. अमन पहिल्या राउंडमध्ये 4-3 ने आघाडीवर राहिला. त्यानंतर अमनने दुसऱ्या राउंडमध्ये क्रूझला एकतर्फी मात दिली. अमनने अखेरपर्यंत मोठ्या फरकाने आघाडी कायम राखली आणि दणदणीत विजय मिळवला. अमितच्या या विजयानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला.
अमन सेहरावत हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सहभागी झालेला एकमेव पुरुष पैलवान होता. त्यामुळे एकट्या अमनवर भारताला कुस्तीत पदक मिळवून देण्याची जबाबदारी होती. अमनने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. अमन यासह ऑलिम्पिकच्या इतिहासातील 16 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये 2008 पासून कुस्तीत सातत्याने पदक जिंकण्याची मालिका सुरु केली. ती आता 16 वर्षांनंतर 2024 मध्ये अमनने कायम ठेवली आहे.
भारतासाठी 2008 साली सुशील कुमार याने कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर सुशीलने 2012 साली रौप्य पदकाची कमाई केली. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये महिला पैलवान साक्षी मलिक हीने भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. साक्षी यासह कुस्तीत ऑलिम्पिक मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया या दोघांनी भारताला कुस्तीत पदक मिळवून दिलं. तर आता अमनने ही मालिका यशस्वीपणे कायम ठेवलीय.
अमनला कुस्तीत कांस्य, 16 वर्षांची परंपरा कायम
BRONZE MEDAL IT IS!!!
Our 6th medal at @paris2024 after a comfortable win for Aman Sherawat in the Bronze Medal match! 👏🏽👏🏽#JeetKaJashn | #Cheer4Bharat pic.twitter.com/jgdYKxCSBi— Team India (@WeAreTeamIndia) August 9, 2024