नीरज चोप्रा भारताचा पहिला फिल्ड एथलीट आहे, ज्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भालफेकपटू नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकत इतिहास रचला होता. नीरजने तेव्हापासून ते आतापर्यंत भालाफेकीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिकनिमित्ताने नीरजचा इथवरचा प्रवास कसा राहिला? हे जाणून घेऊयात.
नीरज गोल्ड मेडळमुळे घरोघरात पोहचला. नीरजने टोक्यो ऑलिम्पिक गाजवलं. मात्र त्याआधी नीरजला फार क्वचितच जण ओळखून होते. अनेक खेळाडू हे आवडीमुळे या क्षेत्राकडे येतात. मात्र त्याबाबतीत नीरजची कहाणी वेगळी आहे. नीरज खेळाकडे आवडीमुळे नाही, तर नाईलाजाने वळला. नीरज मुळचा हरयाणातील पानीपतमधील खांद्रा गावातला. त्याची आई सरोज देवी गृहीणी तर वडील सतीश कुमार हे शेतकरी. नीरज लहाणपणी लठ्ठ होता. त्यामुळे नीरजला त्याच्या आईवडिलांनी त्याला खेळाकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलं पर्यायाने भाग पाडलं.
नीरजने वयाच्या 13 व्या वर्षापासून खेळायची सुरुवात केली. नीरज तेव्हा आवड म्हणून नाही, तर वजन कमी करण्यासाठी आत्मविश्वासासाठी खेळायचा. नीरज नित्यनियमाने पानिपत येथील शिवाजी स्टेडियममध्ये खेळायचा. तेव्हा नीरजवर भारताचे भालाफेकपटू जयवीर चौघरी यांचं लक्ष गेलं. नीरजच्या आयुष्याला इथून खरी कलाटणी मिळाली. नीरजच्या जीवनातील हा टर्निंग पॉइंट ठरला. जयवीर चौधरी यांनी नीरजला भालाफेक या खेळाची तोंडओळख करुन दिली आणि मार्गदर्शन केलं. त्यानंतर नीरजने 1 वर्षानंतर पंचकुला येथील ताऊ देवीलाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नसीम अहमद यांच्या मार्गदर्शनात सराव करु लागला.
नीरजने अवघ्या 2 वर्षात आपली छाप सोडली. वयाच्या 15 व्या वर्षी 2012 नीरज अंडर 16 नॅशनल चॅम्पियन ठरला. नीरजने 68.60 इतका लांब भाला फेकत नवा नॅशनल रेकॉर्ड केला. नीरजने त्यानंतर 2 वर्षांनी यूथ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय रौप्य पदक मिळवलं. नीरजने 2015 साली वयाच्या 18 व्या वर्षी चेन्नईत आंतरराज्यीय स्पर्धेत 77.33 मीटर थ्रो फेकून पहिल्याच नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये धमाका केला.
नीरजसाठी 2016 हे वर्ष आणखी खास ठरलं. नीरज कोलकात्यात नॅशनल ओपन चॅम्पियनशीप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकला. त्यानंतर नीरजने गुवाहाटीत साउथ आशियाई स्पर्धेत 82.23 मीटर थ्रो फेकून वैयक्तिक मेडल टॅलीतील सुवर्ण पदकाची संख्या 1 ने वाढवली. नीरजच्या या कामगिरीने भारतीय सैन्यही प्रभावित झालं. नीरजची 2017 साली भारतीय सैन्यात जूनिअर कमिशन ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. इतकंच नाही, तर राजपुताना रायफल्सने नीरजला थेट नायब सुभेदार हे रँक बहाल करण्यात आलं.
नीरजची सैन्य दलात रुजु झाल्यानंतर मिशन ‘ऑलिम्पिक्स विंग’नुसार सरावासाठी निवड करण्यात आली. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑलिम्पिक्स विंग’ या अंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील 11 खेळांसाठी खेळाडूंची निवड करुन त्यांना ट्रेनिंग दिली जाते. नीरजसाठी ही ट्रेनिंग फार फायदेशील ठरली. नीरजने या ट्रेनिंगनंतर मेडल्सची रांग लावली रांग.
नीरजने 2018 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (कॉमनवेल्थ) 86.47 मीटर थ्रो केला. हा सिजन ऑफ द थ्रो ठरला. नीरजने त्याच वर्षी दोहा डायमंड लीगमध्ये 87.43 मीटर थ्रो फेकत स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. नीरजने ही विजयी कामगिरी सुरुच ठेवली. नीरजने आशियाई गेम्समध्ये 88.06 मीटर थ्रोसह सुवर्ण पदक जिंकलं. मात्र त्यानंतर नीरज दुखापतीच्या जाळ्यात अडकला.
नीरज दुखापतीशी झुंजत होता. तर दुसऱ्या बाजूला टोक्यो ओलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली होती. नीरज खेळणार की मुकणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र कोरोनामुळे नीरजला पुरेसा वेळ मिळाला. जो कोरोना जगातील सर्वांसाठी नासूर ठरला, त्याच कोव्हिडमुळे नीरजला दुखापतीतून सावरण्यासाठी आणि कमबॅकसाठी वेळ मिळाला. नीरजने या संधीचं सोनं केलं. कोरोनामुळे 2021 साली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. नीरजने या स्पर्धेत 87.58 मीटर थ्रो करत इतिहास रचला आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. नीरजच्या कारकीर्दीतील हा सर्वोत्तम थ्रो ठरला.
नीरजचं या सुवर्ण कामगिरीसाठी कौतुक आणि अभिनंदन करण्यात आलं. नीरजने यानंतरही कामगिरीत कोणताही खंड पडू न देता सातत्य कायम ठेवलं. नीरजने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत सिलव्हर मेडल मिळवलं. नीरज यासह वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये मेडल मिळवणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर नीरजने हांगझोऊ एशियन गेम्स 2023 स्पर्धेत आणखी एक गोल्ड मिळवलं.
दरम्यान नीरजच्या या सुवर्ण कामगिरीसाठी त्याचं केंद्र सरकार आणि सैन्य दलाने त्याचा सन्मान केला. नीरजला 2018 साली अर्जून पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच सैन्याने 2020 साली खेळातील योगदानासाठी विशिष्ट सेवा पदकाने त्याचा गौरव करण्यात आला. तसेच 2021 साली मेजर ध्यानचंद खेळ रत्न आणि 2022 मध्ये पद्म श्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं.