ऑलिम्पिक स्पर्धेत एकदा का संधी हुकली की थेट चार वर्षांनी सुधारण्याची वेळ येते. त्यामुळे मागच्या पर्वात केलेल्या चुकांमधून धडा घेत नव्या पर्वात पदकाच्या अपेक्षेने खेळाडू उतरतात. भारताला यंदा टेबल टेनिसमधून पहिल्या पदकाची अपेक्षा आहे. कारण भारतीय महिला टेनिसपटू मनिका बत्राने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पदरी निराशा पडली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा मनिका बत्रा पदकासाठी सज्ज झाली आहे. मनिकाकडे मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दांडगा अनुभव आहे. मनिका बत्राने सांगितलं की, “पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टोक्यो स्पर्धेसारखी चूक करणार नाही. एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.” भारत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील टेनिस प्रकारात वैयक्तिक आणि संघ पातळीवर आव्हान देणार आहे. भारतीय टेबल टेनिस संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरला आहे हे विशेष..यातही मनिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मनिका बत्राने सांगितलं की, “मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेतून बरंच काही शिकता आलं. ज्या काही चुका मी तेव्हा केल्या आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही. माझ्या मानसिकतेत बराच बदल झाला आहे. मी आता पहिल्यापेक्षा जास्त शांत झाली आहे. तसेच माझ्यावरील विश्वास वाढला आहे. मी माझ्या क्षमतेवर आणि तंदुरुस्तीवर भर देत आहे. पदकासाठी आव्हान तयार करणं हे माझं लक्ष्य आहे. पण मी हळूहळू पुढे जाईन. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करू शकेन अशा ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करत आहे .”
“सुरुवातीला मी प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करून पुढे जाईल. यावेळी मी पदकाचा विचार करणार नाही. मी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरला आहे. ही खूप मोठी बाब आहे. मला आनंद आहे की, शिबिरात आम्ही एकत्र सराव करत आहोत. मला वाटते की आमच्याकडे एक पदक जिंकण्याची संधी आहे. यासाठी आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ देणार यात शंका नाही.”, असंही टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हीने सांगितलं.