पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांचा दुहेरी आकडा गाठला आहे. भारताला पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन पदकं मिळाली आहेत. बॅडमिंटनपटू तुलसीमति मुरुगेसन आणि मनीषा रामदास हीने रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं आहे. या पदकांसह भारताची पदक संख्या 11 वर गेली आहे. महिला एसयू 5 कॅटेगरीत तुलसीमति मुरुगेसन हीने रौप्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत चीनच्या यांग किउ जियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असलं तरी पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी भारताच्या महिला बॅडमिंटनपटूने पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेलं नाही. अंतिम सामन्यात तुलसीमति मुरुगेसनने चांगली सुरुवात केली होती. पण ती लय कायम ठेवण्यात अपयश आलं. पहिल्यात सेटमध्ये 17-21 ने पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चीनच्या यांग किउ जियाने संधीच दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये 10-21 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे सुवर्ण पदकाच्या आशा भंगल्या आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
दुसरीकडे, पॅरा बॅडमिंटन महिन्याच्या एसयू 5 कॅटेगरीत भारताच्या पारड्यात कांस्य पदक पडलं. याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुलसीमति मुरुगेनने तिला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. कांस्य पदकाच्या लढाईत मनीषा रामदास हीने डेन्मार्कच्या कॅथरीन रोसेनग्रेनला पराभूत केलं. सरळ दोन सेटमध्ये मनीषाने बाजी मारली. पहिला सेट 21-12 ने जिंकला. त्यानंतर दुसरा सेट 21-8 ने जिंकत कांस्य पदक नावावर केलं. यासह पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
दरम्यान, पुरुषाच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारची जादू दिसली. त्याने ग्रेट ब्रिटेनच्या डेनियल बेथेलचा पराभव केला आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. नितेशने पहिला सेट 21-14 ने जिंकला होता. पण बेथेलने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं आणि 18-21 ने सामना जिंकला. तिसरा सेट एकदम अतितटीचा आणि उत्कंठा वाढवणारा होता. 16-16 अशी बरोबरी होती. त्यामुळे एका गुणांसाठी दोघांमध्ये चुरस निर्माण झाली होती. अखेर नितेशने बाजी मारली.