प्रीति पाल ही उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील हाशमपूर गावातील रहिवासी आहे. लहानपणापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलं आहे. तिचे वडील दुधाची डेअरी चालवतात. प्रीति तिच्या चार भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं अपत्य आहे. त्यामुळे तिच्या वडिलांची तिची पाहून लग्नाची काळजी लहानपणापासूनच वाटत होती. वडील अनिल कुमार पाल यांनी तिच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी मेरठहून दिल्लीला घेऊन आले. पण त्यातही काही यश मिळालं नाही. पण प्रीति यामुळे खचली नाही. परिस्थितीनुसार आपल्या पदरात जे काही पडलं आहे त्याची ताकद म्हणून वापर करण्याचं ठरवलं. याच उद्देशाने प्रीति पॉलचा यशाचा प्रवास सुरु झाला. प्रशिक्षक गजेंद्र सिंग यांच्याकडून एथलिट्सचे धडे घेतले आणि आज यशाच्या शिखरावर बसली आहे. कारण पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने एक नाही दोन पदकं मिळवली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील प्रकारात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला यश मिळालं नव्हतं. पण प्रीति पालने 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत यश मिळवलं आहे. फक्त 48 तासात तिने हे यश पदरी पाडलं आहे. 30 ऑगस्ट रोजी 100 मीटर शर्यतीत आणि 1 सप्टेंबर रोजी 200 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
उत्तर प्रदेशातील दूध विक्री करणाऱ्या अनिल कुमार पाल यांची कन्या आता देशाची लाडकी कन्या झाली आहे. तिच्या यशानंतर वडील अनिल कुमार पाल यांना अश्रू अनावर झाले. तिच्या यशाची गाथा सांगताना त्यांचा ऊर भरून आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘लोक मला बोलायचे की दिव्यांग असल्यामुळे मुलीच्या लग्नात अडचण येईल. पण पॅरिस यशानंतर तेच लोकं मला सांगत आहेत की, मुलीने खूप छान केलं. पूर्ण जगात भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे.’
प्रीति पालने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी वर्ल्ड पॅरा एथलिटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यश संपादित केलं आहे. तिने 2024 मध्ये जापानमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं मिळवून अभिमानस्पद कामगिरी केली आहे.