Wrestlers Protest | सरकारच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन ‘या’ तारखेपर्यंत स्थगित

| Updated on: Jun 07, 2023 | 8:24 PM

Wrestler Meets Anurag Thakur | केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर आणि कुस्तीपटूंमध्ये तब्बल 6 तास चर्चा झाली. आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलंय. आता कुस्तीपटूंना न्यायाची प्रतिक्षा आहे.

Wrestlers Protest | सरकारच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन या तारखेपर्यंत स्थगित
Follow us on

नवी दिल्ली | भारतीय कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात आज 7 जून रोजी बैठक पार पडली. या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. कुस्तीपटूंनी या बैठकीत 5 मागण्या केल्या. यामध्ये बृजभूषण सिंह यांना अटकेच्या मागणीवर जोर दिला. तसेच आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करत असल्याचं माहिती दिली.

क्रीडा मंत्री आणि कुस्तीपटू यांच्यात तब्बल 6 तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर साक्षी मलिक हीने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमचं आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित करत असल्याची माहिती साक्षी मलिकने दिली. तसेच बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करु, असंही साक्षीने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

बजरंग पुनिया काय म्हणाला?

बजरंग पुनिया याने माध्यमांशी संवाद साधला. सरकारने या बैठकीदरम्यान 15 जूनपर्यंत वेळ मागितली आहे. तसेच 15 जूनपर्यंत कारवाई पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे. मात्र आम्ही आमचा विरोध मावळलेला नाही. जर 15 जूननंतर कारवाई न झाल्यास आंदोलनाबाबत विचार करु”, असं बजरंगने म्हटलंय.

“आमच्यात आज जी चर्चा झाली ती आधीच व्हायला हवी होती. तसेच कुस्तीपटूंवर 28 मे रोजी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे”, अशी माहितीही बजरंगने यावेळेस दिली.

क्रीडा मंत्री काय म्हणाले?

दरम्यान क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी निवेदनाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारकडून काल 6 जून रोजी कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रण पाठवलं होतं. आज बराच वेळ चर्चा झाली. बृजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर 15 जूनपर्यंत चौकशी करुन चार्जशीट दाखल करण्यात येईल. तसेच कुस्तीपटूंच्या इतर मागण्यांबाबतही गंभीरतेने विचार करण्यात येईल. ही बैठक सकारात्मक झालीय”, असं ठाकुर म्हणाले.

अनुराग ठाकुर काय म्हणाले?

दरम्यान अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी 6 जून रोजी रात्री उशिरा ट्विटद्वारे कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर क्रीडा मंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. दरम्यान कुस्तीपटूंची सरकारसोबतची गेल्या 4 दिवसातील ही दुसरी बैठक आहे. याआधी रविवारी कुस्तीपटू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक पार पडली होती.

त्यानंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे आपल्या रेल्वेतील नोकरीत रुजु झाले होते. दरम्यान आता सरकारने कुस्तीपटूंना दिलेल्या आश्वासनाचं नक्की काय होतं, हे 15 जूननंतरच स्पष्ट होईल.