पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 200 हून अधिक देशांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या प्रत्येक खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रत्येक देशाने आपल्या खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला आहे. त्यामुळे पदकाची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळे खेळाडूंची विशेष काळजी घेतली जात आहे. असं असताना जापानने आपल्याच खेळाडूला दणका दिला आहे. पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 26 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच जापानने खेळाडूला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्पर्धेतून आऊट केलं आहे. 19 वर्षीय शोको मियातावर देशाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे. धूम्रपान आणि मद्यपान करताना पकडल्याने तिला मायदेशी पाठवलं आहे. मोनॅको येथील संघाच्या प्रशिक्षण शिबिरातून तिला काढण्यात आलं आहे. शोकोला आता देशात चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत शोकोने कांस्य पदक पटकावलं होतं. त्यामुळे तिच्याकडून ऑलिम्पिक स्पर्धेत अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र नियम मोडल्याने तिला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
जापान हा शिस्तप्रिय देश म्हणून ओळखला जातो. शिस्त म्हणजे काय असते याची अनेक उदाहरणं जापानने जगासमोर ठेवली आहेत. फुटबॉल स्पर्धेत पराभवानंतरही जापानी प्रेक्षक मैदानात स्वच्छता करताना दिसले आहेत. दरम्यान, शोकोला बाहेर काढल्यानंतर जापान जिम्नॅसटिक्स असोसिएशनने चाहत्यांची माफी मागितली आहे. जापानी कायद्यानुसार, 20 वर्षाखालील व्यक्तीने मद्यपान आणि धूम्रपान करणं बेकायदेशीर आणि दंडनीय आहे. त्यामुळे शोकोला कोणतीच दयामाया दाखवली गेली नाही. शोको मियाता हा सध्याचा जापानी राष्ट्रीय विजेता आहे. आता जिम्नॅस्टिक संघात पाच ऐवजी चार खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करतील.
शोकोच्या गैरहजेरीमुळे ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये जापानच्या पदकाच्या आशा मावळल्या आहेत. जापानने 1964 मध्ये महिलांच्या वैयक्तिक गटात अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात जापानच्या संघाने सुवर्णपदक जिंकलं होते. प्रशिक्षक मुत्सुमी हरदा यांनी सांगितलं की, ‘तिच्यावर चांगल्या कामगिरीचं मोठं दडपण होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. त्यामुळे लोकांनी तिला समजून घ्यावं अशी विनंती करतो.’