साऱ्या क्रीडा चाहत्यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे वेध लागले आहेत. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात एकूण 35 पदकं जिंकली आहेत. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदकं जिंकली. तर भारतासाठी पदकांच्या हिशोबाने लंडन ऑलिम्पिक 2012 ही स्पर्धाही अविस्मरणीय ठरली. भारतासाठी लंडन ऑलिम्पिक ही आतापर्यंतची दुसरी यशस्वी स्पर्धा राहिली आहे. भारताकडून तेव्हा 60 पुरुष आणि 23 महिला असे एकण 83 खेळाडू सहभागी झाले. तर टीम म्हणून भारतीय हॉकी संघाने क्वालिफाय केलं. भारताने तेव्हा 6 मेडल्स जिंकले. त्यामध्ये 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. भारताने बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान डोपिंगमध्ये नाव आल्यानंतर 2 वर्षांच्या निलंबनानंतर वेटलिफ्टिंगमध्ये कमबॅक केलं. भारताने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र लंडन ऑलिम्पिक भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहिलं ते मेरी कॉम आणि सायना नेहवाल या दोघींनी मिळवलेल्या मेडल्समुळे.
भारतीय खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये 6 मेडल्स जिंकून त्यावेळेस इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र तेव्हा चर्चा झाली ती फक्त नि फक्त मेरी कॉम आणि सायना नेहवाल या दोघींची. मेरी कॉमने बॉक्सिंग आणि सायनाने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवलं. याआधी भारतीय महिला खेळाडूंना बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये मेडल्स मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. त्यानंतर पीव्ही सिंधू आणि लवलीना बोरगोहेन या दोघींनी बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये पदकांची लयलुट केली.
अभिनव बिंद्रा याने 2008 सालच्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये इतिहास रचत गोल्ड मेडल मिळवलेलं. मात्र 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अभिनवला फायनलपर्यंत पोहचता आलं नाही. मात्र ही उणीव विजय कुमार आणि गगन नारंग या दोघांनी भरुन काढली. गगनने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर विजय कुमार याने 25 मीटर रॅपिड फायर पिस्टलमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.भारतासाठी ऑलिम्पिकच्या इतिहासातील या खेळातील हे पहिलंवहिलं रौप्य पदक होतं.
बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि शूटिंगनंतर कु्स्तीपटूंनी यशस्वी डाव टाकला. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या दोघांनी प्रत्येकी 1-1 मेडल पटकावलं. या दोघांमुळे भारताच्या पदकांची संख्या ही 6 इतकी झाली. भारताने स्वत:चाच सर्वाधिक लंडनमधील 6 मेडल्सचा विक्रम हा टोक्यो स्पर्धेत ब्रेक केला. योगेश्वर दत्त याने 60 किलो वजनी गटात उत्तर कोरियाच्या जंग म्योंगला चितपट करत तिसरं स्थान पटकावलं आणि कांस्य पदक मिळवलं. भारताचं हे लंडन ऑलिम्पिकमधील पाचवं पदक ठरलं. त्यानंतर 2008 चा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार याने धमाका केला. सुशीलने एक पाऊल पुढे टाकलं आणि सिलव्हर मेडल पटकावलं. सुशील कुमार यासह ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.