ऑलिम्पिक स्पर्धेचा श्रीगणेशा 1900 साली पॅरिसमध्ये झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा 124 वर्षांनंतर या पॅरिसला ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत भारताकडून 112 खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताकडून याआधी टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत 123 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. भारताने त्या स्पर्धेत सर्वाधिक 7 पदकं जिंकली. भारताने तेव्हा 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली. मात्र रियो ऑलिम्पिक भारतासाठी निराशाजनक राहिला. ऑलिम्पिक 2016 मध्ये नक्की काय झालं होतं? जाणून घेऊयात.
रियो ऑलिम्पिक 2016 स्पर्धेचं आयोजन हे ब्राझीलमध्ये करण्यात आलं. या स्पर्धेत भारताच्या एकूण 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. मात्र भारताला फक्त 2 पदकंच मिळवता आली, पण हे ऐतिहासिक होतं. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, जेव्हा भारतासाठी महिलांनी पदकं जिंकली. बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर भारताची झोली यंदा रिकामी राहणार, असं वाटत होतं. मात्र पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि साक्षी मलिक हीने कुस्तीत कांस्य पदक मिळवून दिलं. या दोघींनी भारताची लाज राखली.
वूमन्स हॉकी टीम इंडियासाठी 2016 रियो ऑलिम्पिक ऐतिहासिक असं ठरलं. वूमन्स हॉकीची ऑलिम्पिक स्पर्धेत क्वालिफाय करण्याची तिसरी वेळ ठरली.
रियो ऑलिम्पिकमधून भारतीय चाहत्यांना फार आशा होत्या, मात्र ते प्रत्यक्षात होऊ शकलं नाही. काही खेळाडू मेडल्सजवळ पोहचले, पण त्यांना यश आलं नाही. काही खेळाडू आणि क्वार्टर आणि सेमी फायनलमधून बाहेर झाले. त्यामुळे आता साक्षी मलिकने लाज राखली. साक्षी मलिकने रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची ओपनिंग करु दिली. विनेश फोगाटकडून आशा होती, मात्र ऐनवेळीस झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाली, त्यामुळे भारताला एका पदकाला मुकावं लागलं.
रियो ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट व्यतिरिक्त भारताला हाताशी आलेले 5 मेडल्स गमवावे लागले. भारत या मेडल्सपासून एक पाऊल दूर राहिली. सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना, दीपा कर्माकर, किदांबी श्रीकांत, विकास कृष्णन आणि मेन्स हॉकी टीम इंडियाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. मात्र सर्व क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाले.
रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा भारताचे आघाडीचे टेनिस स्टार. दोघेही रियो ऑलिम्पिकमध्ये डबल्स टेनिसच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचले. मात्र त्यांना अमेरिकेकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र यानंतरही दोघांना कांस्य पदकाची संधी होती, मात्र इथेही अपयश आलं.चेक रिपब्लिकच्या जोडीने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताला पराभूत केलं.
तसंच मेन्स हॉकी टीम इंडियाकडून आशा होत्या. टीममध्ये एकसेएक दिग्गज होते. साखळी फेरीपर्यंत भारताने दमदार कामगिरी केली. मात्र क्वार्टर फायनलमध्ये आघाडी घेतल्यानंतरही बेल्जियमने टीम इंडियाला पछाडलं आणि पराभूत केलं.
बॅडमिंटनमध्ये जागितक पातळीवर अव्वल स्थानी असलेल्या किदांबी श्रीकांतकडून मेडल्सची आशा होती. मात्र चीनच्या शटलरने पराभूत करून श्रीकांतला बाहेर केलं. त्यानंतर बॉक्सर विकास कृष्णन उज्बेकिस्तानकडून पराभूत झाला. जिमनास्टिक दीपा कर्माकर हीने 52 वर्षात पहिल्यांदा क्वालिफायर करुन सर्वांना थक्क केलं. मात्र तिला चौथ्या स्थानीच समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेत लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, ज्वाला गुट्टा, योगेश्वर दत्त, सायन नेहवाल, अश्विनी पोनप्पा आणि शरत कमल यासारखे अनुभवी खेळाडूही होते. यातील काही खेळाडूंनी आधी ऑलिम्पिकमध्ये मेडल्सही जिंकले होते. मात्र रियोमध्ये त्यांची झोली रिकामीच राहिली.
सायना नेहवाल ही 2015 मध्ये वर्ल्ड नंबर 1 ठरली. तिने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं. मात्र सायना 2016 च्या ऑलिम्पिकमधून साखळी फेरीतूनच बाहेर झाली. तर त्याआधी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी साखळी फेरीतील 3 सामन्यात पराभूत झाल्याने आधीच बाहेर झाली.
टेबल टेनिस स्टार शरत कमल आणि टेनिस डबल्सचे खेळाडू रोहन बोपन्ना-लिएंड पेस पहिल्या फेरीपर्यंतच मर्यादित राहिले. कुस्तीपटू योगेश्वर दत्त हा देखील पहिल्याच फेरीतून बाहेर झाला. त्याशिवाय 100 मीटर स्पर्धेतील प्रसिद्ध स्प्रिंटर दुती चंद हीनेही निराशा केली.
शूटिंगमध्ये अभिनव बिंद्रा, गगन नारंग, जितू राय आणि हीना साधू असे मातब्बर खेळाडू होते. मात्र हे खेळाडूंनी निराशा केली. अभिनव बिंद्रा याने 2008 मध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. तसेच गगन नारंग याने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं. तर जितू राय आणि हीना सिधू दोघेही वर्ल्ड नंबर 1 राहिले होते. मात्र 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात दोघे अपयशी ठरले.