पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झालं असं की..

| Updated on: Aug 15, 2024 | 3:35 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बऱ्यापैकी प्रदर्शन केलं. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत एक पदक कमी आलं. पण खेळाडूंची मेहनत या स्पर्धेत दिसून आली. काही जणांचं पदक थोडक्यासाठी हुकलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झालं असं की..
Image Credit source: Twitter
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 117 खेळाडूंचा चमू गेला होता. विविध प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताने या स्पर्धेत एकूण सहा पदकं मिळवली. यात एका रौप्य पदकाचा समावेश आहे. तर पाच कांस्य पदक आहेत. भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य, मनु भाकरने दोन कांस्य पदकं मिळवली.  तर काही खेळाडूंना चौथ्या स्थानावर राहावं लागलं. दरम्यान, भारतात परतलेल्या खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांचं निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे खेळाडूंनी भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही भेटवस्तू दिल्या. नेमबाज मनु भाकरने पीएम मोदींना पिस्तूल दिली. तर कुस्तीपटू अमन सहरावत आणि हॉकीपटू पीआर श्रीजेशने आपली जर्सी गिफ्ट दिली. तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने टीमकडून पंतप्रधान मोदींना हॉकी स्टिक दिली.  दुसरीकडे, स्वप्निल कुसालेची भेट घेत पंतप्रधानांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनशीही चर्चा केली. लक्ष्य सेन कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झाला होता.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून अजूनही काही खेळाडू मायदेशी परतलेले नाहीत. यात नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट ही नावं आहेत. नीरज चोप्रावर सर्जरी होणार असून तो जर्मनीत गेला आहे. तर कुस्तीपटू विनेश फोगाट 17 ऑगस्टला मायदेशी परतणार आहे. सीएएसने विनेश फोगाट अपील फेटाळल्याने पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. दुसरीकडे, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु या भेटीदरम्यान नव्हती. सिंधुची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली. राउंड 16 मध्येच पराभूत व्हावं लागलं होतं.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ऑलिम्पिक विजेत्यांचा उल्लेख केला होता. तसेच 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली पाहीजे. हे भारतीयांचं स्वप्न आहे, हे सांगण्यासही विसरले नाहीत. मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं संमेल्लन पार पडलं होतं. तेव्हा भारताने यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. पुढच्या वर्षी आयओसी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यानंतर 2036 ऑलिम्पिक स्पर्धेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.