खो खो वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 13 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हे सामने होणार आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही पातळीवर ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतून पाकिस्तान बाद झाली असून आता 39 संघच खेळणार आहेत. पुरुष गटात 20 देश सहभागी असून पाकिस्तानचं यात नाव नाही. खरं तर या स्पर्धेतील पहिला सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार होता. पण आता तसं होणार नाही. यासाठी खो खो फेडरेशनने नवं वेळापत्रक जारी केलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार भारताचा पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळशी होणार आहे. तर महिला संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, विजा न मिळाल्याने पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नाही.
खो खो वर्ल्डकप सीओ गीत सूदन यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही या स्पर्धेची रुपरेषा आखली होती तेव्हा आम्हाला वाटलं की सर्व काही ठरल्याप्रमाणे होईल. पण आमच्या हातात काहिच नाही. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांचं स्पर्धेत खेळणं आता शक्य नाही.’ चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतही दोन्ही देशात वाद झाला होता. भारताने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामने हायब्रीड मॉडेलवर दुबईत खेळवले जाणार आहेत.
खो खो वर्ल्डकप स्पर्धेतील सामने 13 जानेवारीपासून सुरु होणार असून 16 जानेवारीपर्यंत साखळी फेरी असणार आहे. 17 जानेवारीपासून बाद फेरीचे सामने सुरु होतील. तर 19 जानेवारीला अंतिम फायनल सामना असेल. पुरुष गटात एकूण 20 संघ असून त्याची चार गटात वर्गवारी केली जाणार आहे.दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड, इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि केनिया हे देशही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. भारताचा साखळी फेरीत सामना नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूटानशी होईल.