कुस्तीपटू विनेश फोगाट हीच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून विनेशला रौप्य पदक मिळावं यासाठी खटाटोप सुरु होता. यासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आली होती. पण अपील फेटाळून लावल्याने आता आशा संपुष्टात आल्या आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघाने हा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे भारताची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक संख्या ही सहाच राहणार आहे. दुसरीकडे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्षा पीटी उषा यांनी या निर्णयानंतर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच विनेश फोगाटसोबत उभं असल्याचं सांगितलं आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात भाग घेतला होता. वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी आणि त्यानंतर आणखी दोन कुस्तीपटूंना धूळ चारत विनेश अंतिम फेरीत पोहोचली होती. पण 100 ग्रॅम वजन अधिक निघालं आणि अपात्र ठरली.
विनेशने यापूर्वी सुवर्ण पदकाच्या लढाईसाठी अपील केली होती. सीएएसने तेव्हाच तिची अपील फेटाळून लावली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत पराभूत झालेली स्पर्धक अंतिम फेरी खेळली. त्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक मिळावं यासाठी अपील केली. पण ही याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे विनेशचं पदक स्वप्न भंगलं आहे. दरम्यान सीएएसने एका ओळीतच निकाल दिला आहे. ‘7 ऑगस्टला विनेश फोगाटकडून दाखल करण्यात आलेला अर्ज रद्द करण्यात आला आहे.’, इतकंच सीएएसने निकालात लिहिलं आहे. 13 ऑगस्टला निकाल येणार होता. पण हा निकाल पुढे ढकलण्यात आलं होता.
कुस्तीपटू विनेश फोगाटने निराश होत कुस्तीला रामराम ठोकला आहे. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशने भाग घेतला होता. पण तिन्ही ऑलिम्पिक स्पर्धेत झोळी रिती राहिली. दोन ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश 53 किलो वजनी गटात खेळली होती. पण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशने वजन कमी करत 50 किलो वजनी गटात भाग घेतला. या गटात तिची कामगिरी चांगली राहिली. पण शेवटच्या सामन्यापूर्वी घोळ झाला आणि पदक हुकलं.