भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट ही दुर्देवी ठरली. विनेश फोगाट हीचं वाढीव वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत हक्काचं रौप्य पदक गेलं. तर गोल्ड मेडल जिंकण्याची संधीही या वाढलेल्या वजनाने हिरावून घेतली. विनेश आता त्यानंतर 17 ऑगस्टला भारतात परतणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनेश सकाळी 10 वाजता दिल्ली विमानतळावर पोहचणार आहे. विनेशला वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र करण्यात आलं. विनेशने त्यानंतर कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. विनेशने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादात धाव घेत या निर्णयाला आव्हान दिलं. मात्र क्रीडा लवादानेही तिची याचिका फेटाळली. त्यानंतर विनेशने एक 3 पानी पत्र सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
विनेशने या 3 पानी पत्रातून खूप काही म्हटलंय. विनेशने या पत्रात आपल्या स्वप्नांबाबत, वडीलांच्या आशा आणि आईच्या संघर्षाचा उल्लेख केलाय.”एका छोट्या गावातली मुलगी असल्याने मला ऑलिम्पिक किंवा रिंगचा अर्थ माहित नव्हता. लहानपणी माझं लांब केस ठेवण्याचा, मोबाईल वापरण्याचं आणि प्रत्येक काम करण्याचं स्वप्न होतं, जे सर्वसामान्यपणे सर्व मुलींचं स्वप्न असतं. माझे वडील हे बस चालक होते. मी माझ्या मुलीला विमानातून प्रवास करताना पाहिन, असं ते म्हणायचे. मी रस्त्यापुरता मर्यादित राहिलो, मात्र मीच त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवेन,असा विश्वास वडिलांना माझ्याबाबत होता. मला हे सांगायचं नव्हतं, पण मला वाटतं की मी त्यांची लाडकी होते. कारण मी सर्वात लहान होते”, असं विनेशने म्हटलंय.
“सांगण्यासाठी खूप काही आहे. मात्र शब्द कमी पडतील. मला जेव्हा याबाबत बोलणं योग्य वाटेल त्यावेळी मी याबाबत बोलेन. मात्र आम्ही 6 ऑगस्टची रात्र आणि 7 ऑगस्टच्या सकाळपर्यंत प्रयत्न केले, मला इतकंच सांगायचंय. आम्ही परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाहीत. मात्र आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. माझी टीम, माझे भारतीय सहकारी आणि माझ्या कुटुंबाला असं वाटत की आम्ही ज्यासाठी मेहनत घेत होतो आणि ध्येयाला झपाटून जे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत होतो, ते अपूर्णच राहिलं. नेहमीच काही न काही उणीव राहू शकते. तसेच त्या गोष्टी पुन्हा आधीसारख्या होऊ शकत नाहीत”, असं विनेशने नमूद केलं.
विनेशकडून सोशल मीडियावर पोस्ट
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 16, 2024
“कदाचित वेगळ्या परिस्थितीत मी स्वत:ला 2032 पर्यंत खेळताना पाहू शकेन, कारण माझ्यात लढाई आणि कुस्ती कायम असेल. माझ्यासोबत भविष्यात काय होईल, याबाबत मी भविष्यवाणी करु शकत नाही. मात्र मला विश्वास आहे की मी त्यासाठी लढत राहणार, ज्यावर माझा विश्वास आहे आणि जे योग्य आहे.”