पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजन गटात फायनलमध्ये प्रवेश केल्यावर अपात्र ठरवण्यात आलं होतं. फायनल सामन्याआधी विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलं. या निर्णयामुळे सर्व भारतीयांना धक्का बसला होता. संघर्ष करत फायनल गाठलेल्या विनेशनेही कुस्तीमधून निवृत्तीची घोषणी केली. अशातच सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
विनेश फोगाटने फायनलसाठी अपात्र करण्याच्या आयओसीच्या निर्णयाला क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) आव्हान दिलं आहे. विनेशने अपील केलं असून फायनल सामना किंवा संयुक्त रौप्य पदक द्यावे, असं आवाहन केले गेले होते. अशातच विनेश फोगाटचे हे अपील मान्य केल्याची माहिती सजमत आहे. याबाबत CAS लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो गटात सेमी फायनल जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला होता. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली कुस्तीपटू ठरली होती. संपूर्ण देश फायनल सामन्याची वाट पाहत होता. फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र विनेश अपात्र झाल्याची बातमी आली सर्वांनाच धक्का बसला. बुधवारी सकाळी फायनल सामन्याआधी तिचे सकाळी 7:15 वाजता विनेशचे वजन करण्यात आले होते. त्यावेळी तिचे वजन 50 किलो 100 ग्रॅम भरले होते. त्यामुळे तिला फायनलआधी अपात्र ठरवण्यात आलं.
विनेशने पहिल्याच सामन्यात चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या युई सुसाकीचा 3-2 ने पराभव केला. त्यानंतर युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 ने पराभव करत सेमी फायनल गाठली. या सेमी फायनल सामन्यामध्ये 5-0 ने क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव करत फायनल गाठली होती. आता सुवर्णपदकापासून विनेश फोगाट एक पाऊल दूर होती. मात्र सेमी फायनल सामन्यानंतरचे पुढचे बारा तास सर्व काही बदलवून टाकणारे होते. फायनलपर्यंत वाघिणीसारखी लढत आलेली विनेश फोगाट फक्त 100 ग्रॅम वजन जास्त झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं.
दरम्यान, विनेश फोगाटबाबत ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या निर्णयावर देशी आणि विदेशी कुस्तीपटूंनी आपली मते मांडलीत. यामध्ये काहींनी तिच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं. तर काहींनी तिला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.