पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटने उपांत्य फेरीचा सामना जिंकला आणि पदक निश्चित केलं होतं. संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. पण दुसऱ्या दिवशी या आनंदावर विरजन पडलं. कारण विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आलं होतं. 50 किलो वजनी गटात विनेशचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचं निष्पन्न झालं आणि वादाला फोडणी मिळाली. पण नियमांवर बोट दाखवत ऑलिम्पिक समितीने विनेशला अपात्र असल्याचं घोषित केलं. त्यानंतर विनेशने सीएएसकडे अपील केलं. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशा पडली. पण या सर्व घडामोडी होण्यापू्र्वी बरंच काही घडलं होतं. विनेशचे प्रशिक्षक वूलर एकॉसने केलेल्या खुलाशानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. वूलर यांनी सांगितलं की,एका क्षणासाठी असे वाटले की विनेश फोगाट आपला जीव गमावू शकते.
विनेश फोगाटचे प्रशिक्षक वूलर एकॉस यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘उपांत्य फेरीनंतर तिचं वजन 2.7 किलो वाढलं होतं. 1 तास 20 मिनिटं वर्कआऊट केल्यानंतर दीड किलो वजन बाकी होतं. 50 मिनिटं सोना सेशन केलं पण त्यात काही घाम आला नाही. असं असताना तिने पुन्हा कार्डिओ मशिनवर वर्कआऊट केलं. मध्यरात्रीपासून सकाळी 5.30 वाजेपर्यंत रेसलिंग आणि कार्डियो करत होती. कित्येक वेळा थकल्यानंतर पडली. मला खरंच एक क्षण असं वाटलं की तिच्या जीवाला धोका आहे.’
कुस्तीपटू विनेश फोगाटने वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. तरीही तिचं वजन शेवटी 100 ग्राम अधिक आलं. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं. यानंतरही ती हताश झाली नाही. तेव्हा विनेश फोगाटने प्रशिक्षक वूलर एकॉस यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की, ‘कोच निराश होऊ नका. मी जगातील बेस्ट कुस्तीपटूला हरवलं हे. मी माझं ध्येय गाठलं आहे. बेस्ट कुस्तीपटू असल्याचं मी दाखवून दिलं आहे. आपल्या गेम प्लानने काम केलं. पदक तर फक्त एक वस्तू आहे. कामगिरी महत्त्वाची ठरते.’