भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीची क्रीडा लवादाने बुधवारी 14 ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची याचिका फेटाळली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्राम वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने या निर्णयाला आव्हान देत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट या सर्वोच्च क्रीडा न्यायलयात धाव घेतली. क्रीडा लवादाने एकूण 3 वेळा निकाल राखून ठेवला. त्यानंतर बुधवारी तडकाफडकी निर्णय जाहीर केला. क्रीडा लवादाने विनेशची याचिका फेटाळली. विनेशने ही याचिका फेटाळल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
विनेशची याचिकाच फेटाळल्याने तिला मेडल मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. विनेशने या निर्णयाच्या काही तासांनंतर इंस्टाग्रामवर तिचा मॅटवर पडलेल फोटो पोस्ट केला आहे. विनेशचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विनेशने या फोटोत आपल्या डोळ्यांवर हात ठेवले आहेत. विनेशचा हा फोटो पॅरिस ऑलिम्पिकमधील विजयाचा आहे. मात्र विनेशने विजयाचा हाच फोटो याचिका फेटाळल्यानंतर बी पराग यांच्या ‘जिंदगी सिद्दी कर देंदा’ या गाण्यासह पोस्ट केला आहे.
विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवलं. विनेशने अंतिम फेरीत पोहचताच 2 विक्रम केले. विनेशने रौप्य पदक निश्चित केलं. तसेच विनेश ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरली. विनेशचा सुवर्ण पदकासाठीचा सामना हा दुसऱ्याच दिवशी 7 ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र त्याआधी अघटित घडल. अंतिम सामन्याआधी विनेशच्या वजनात प्रमाणापेक्षा 100 ग्राम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला थेट अपात्र करण्यात आलं.
विनेशची इंस्टाग्राम पोस्ट
विनेशने या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवादात धाव घेतली. विनेशची क्रीडा लवादात हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या 2 निष्णात ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर क्रीडा लवादाने 3 वेळा निकाल राखून ठेवला. या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी निकाल येणार होता. मात्र क्रीडा लवादाने 14 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला आणि याचिकाच फेटाळली.त्यामुळे भारताला मोठा झटका लागला.
दरम्यान विनेशने क्रीडा लवादाच्या निर्णयाआधीच आपण कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं होतं. विनेशला जर रौप्य पदक मिळालं असतं तर ते भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरं आणि एकूण सातवं मेडल ठरलं असतं. मात्र भारताला हक्काचं पदक गमवावं लागलं. त्यामुळे भारतीयांमध्ये ही खंत आणि तेवढाच रोषही आहे.