नवी दिल्ली | भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणारे अनेक कुस्तीपटू हे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंचं लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनय फोगाट सहभागी आहेत. तर इतर कुस्तीपटूंचाही त्यांना पाठींबा आहे.
अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर कुस्तीपटूंनी रेल्वेतील नोकरीत रुजु झाले. त्यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याची अफवा पसरल्या. त्यानंतर साक्षी मलिक हीने आमचा लढा सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता बजरंग पुनिया याने ट्विट केलं आहे. बजरंगचं ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे.
बजरंगने आपल्या ट्विटमधून स्वत:ला किंवा सहकारी कुस्तीपटूंना धमकी देणाऱ्यांनी कोणत्याही भ्रमात न राहण्याचा रोखठोक इशाराच दिला आहे. तसेच या लढ्यात सरकारी नोकरी गमवावी लागली तरी हरकत नसल्याचं स्पष्टपणे म्हटलंय.
हमारे मेडलों को 15-15 रुपए के बताने वाले अब हमारी नौकरी के पीछे पड़ गये हैं.
हमारी ज़िंदगी दांव पर लगी हुई है, उसके आगे नौकरी तो बहुत छोटी चीज़ है.
अगर नौकरी इंसाफ़ के रास्ते में बाधा बनती दिखी तो उसको त्यागने में हम दस सेकेंड का वक्त भी नहीं लगाएँगे. नौकरी का डर मत दिखाइए.
— Bajrang Punia ?? (@BajrangPunia) June 5, 2023
“आमच्या पदकांची किंमत 15-15 रुपये सांगणारे आता आमच्या नोकीरच्या मागे लागले आहेत. आमचा जीव धोक्यात आहे. त्यासमोर नोकरीतर फारच लहान बाब आहे. जर नोकरी न्यायाच्या वाटेत आड येत असेल तर त्याचा त्याचा त्याग करण्यात 10 सेकंदही लागणार नाहीत. नोकीरची भीती दाखवू नकात”, अशा शब्दात बजरंगने चांगलीच कानउघडणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बृजभूषण सिंह यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी कुस्तीपटूंच्या पदकाची किंमत करत आपलं ज्ञान पाजळलं होत. “पदकं परत करायची असतील तर त्यासोबत मिळालेली बक्षिसाची रक्कम परत करा, पदकाची किंमत तर 15-15 रुपये आहे, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. बजरंग पुनियाच्या ट्विटमध्ये याच वाक्याचा संदर्भ आहे.
दरम्यान अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर कुस्तीपटू हे रेल्वेत नोकरीवर रुजु झाले आहेत. रविवारी 4 जून रोजी या आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट जवळपास 2 तास चालली. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 जून रोजी हे कुस्तीपटू कामावर रुजु झाले. त्यामुळे या कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याची अफवा पसरली. मात्र आम्ही आंदोलनातून माघार घेतली नसल्याचं या कुस्तीपटूंनी विविध माध्यमातून स्पष्ट केलं.