मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये द फिन्ड आणि ब्रे वायट या नावाने प्रसिद्ध असलेला विंडहेम रोटुंगा रेसलर याने जगाचा निरोप घेतला आहे. जबरदस्त शरीरयष्टी असलेल्या रोटुंगाचं वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. भल्याभल्यांना रिंगमध्ये पाणी पाजणाऱ्या रोटुंगाची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रे वायट गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. पण नेमकं काय झालं होतं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आजार बळावल्याने गेल्या काही महिन्यांपासून रिंगपासून दूर गेला होता. मात्र अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना विश्वास बसणं कठीण झालं आहे. घरच्यांनी ब्रे वायट याचं निधन झाल्याच्या बातमीला दुजोरा दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
विंडहेम रोटुंगा याच्या तीन पिढ्यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंग गाजवली आहे. विंडहेमचे आजोबा ब्लॅकजॅक आणि वडील माइक रोटुंगा यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये आपली ताकद दाखवली आहे.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विंडहेमनं याच क्षेत्रात करिअर करण्याची ठरवलं. ब्रे वायटने दोन वेळा डब्ल्यूडब्ल्यू युनिव्हर्सल चॅम्पियनशिप, तर एकदा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं आहे. 2019 मध्ये ब्रे वायटला डब्ल्यूडब्ल्यूई मेल रेसलर ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं.
डब्ल्यूडब्ल्यूई कंपनीचे सीईओ ट्रिपल एच यांनी सोशल मीडियावर ब्रे वायट याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्रिपल एचने ट्वीट करत लिहिलं की, “डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम आणि विंडहेमचे वडील यांनी फोन करून माईक रोटुंडा याच्या निधनाची बातमी दिली . आमच्या डब्ल्यूडब्ल्यूई कुटुंबातील एक सदस्य आम्ही गमावला आहे. आम्ही त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. ”
Rest in peace Legend💜💜 🦅
pic.twitter.com/fNNlhlFnXX— Míchaél SNM:🕹 🥕 (@MchaelSNM1) August 24, 2023
वायट रेसलमेनिया 39 मध्ये पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरेल अशी अपेक्षा होती. ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. पण अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.