नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकनंतर आता पाकिस्तानाचा आणखी एक क्रिकेटर भारताचा जावई होणार आहे. हरियाणातील नूहमध्ये राहणारी शामिया आरजू हिने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी (Hasan Ali) लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 ऑगस्टला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे. शामिया ही एअर अमीरेट्स (air emirates) या कंपनीत फ्लाईट इंजिनिअर म्हणून काम करते. अमर उजाला या हिंदी वेबसाईटने याची बातमी दिली आहे.
अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, शामियाच्या परिवारात जवळपास 10 सदस्य असून ते सर्व 17 ऑगस्टला दुबईसाठी रवाना होणार आहे. हसन अलीचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला आहे. या दोघांचा विवाहसोहळा दुबईतील अटलांटिक पाम जुबेरा पार्क या हॉटेलमध्ये पार पडणार आहे.
मला आज ना उद्या माझ्या मुलीचे लग्न करुन द्यावे लागणार आहे. मग ते भारतातील मुलाशी असो किंवा पाकिस्तानातील मला याचा काहीही फरक पडत नाही. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान माझे अनेक नातेवाईक पाकिस्तानात निघून गेले. पण आमचे कुटुंब त्यांच्या संपर्कात आहोत असे मत शामियाचे वडील लियाकत अली यांनी सांगितले.
असे ठरले लग्न
शामिया आणि हसन अलीचे लग्न शामियाच्या पंजोबांनी ठरवले. पाकिस्तानचे माजी संसदपटू आणि रेल्वे चेअरमॅन सरदार तुफैल आणि शामियाचे पंजोबा हे सख्खे भाऊ आहेत. फाळणीनंतर शामियाचे पंजोबा हे भारतात राहिले आणि त्यांचे भाऊ म्हणजेच तुफैल हे पाकिस्तानात निघून गेले. तुफैल यांचा परिवार पाकिस्तानातील कसूर जिल्ह्यातील कच्ची कोठी नईयाकी परिसरात राहतो. तुफैल यांच्या परिवारामुळे शामिया आणि हसन अलीचे लग्न ठरले.
शामियाने मानव रचना युनिवर्सिटीतून ऐरोनॉटिकल इंजिनिअरमध्ये बी टेक केले आहे. याआधी ती जेट एअरवेजमध्ये काम करत होती. गेल्या तीन वर्षांपासून एअर अमीरेट्स (air emirates) मध्ये काम करते.
हसन अली हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने 9 कसोटी सामन्यात 31 विकेट्स घेतले आहेत. तर 53 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने 82 विकेट्स घेतल्या आहेत.