मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय तरुणीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दुबई-स्थित शामिया आरझूसोबत लगीनगाठ बांधणार असल्याची कबुली खुद्द हसनने दिली.
येत्या 20 ऑगस्टला दुबईमध्ये हसन आणि शामिया यांचा निकाह होणार आहे. शामिया ही एमिरेट्स एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर तिचे कुटुंबीय भारतात दिल्लीमध्ये राहतात.
हा विवाह सोहळा खाजगी स्वरुपाचा असावा, अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र मीडियामध्ये याबाबत चर्चा रंगू लागल्यामुळे अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय मी घेतला, असं हसनने सांगितलं.
पाकिस्तानात होणार निकाह
पाकिस्तानातील गुजरनवाला शहरात हसन आणि शामिया लग्नानंतर राहणार आहेत. 20 ऑगस्टला विवाह झाल्यानंतर तीन महिन्यांनी रुखसाती (रिसेप्शन) होईल, अशी माहिती हसनने दिली.
हरियाणातील मानव रचना विद्यापीठातून शामियाने एअरोनॉटिक्स विषयात पदवी मिळवली आहे. इंग्लंडमध्ये तिने उच्चशिक्षण घेतलं होतं.
शामियाचा भारतीय पोशाख
लग्नात शामिया भारतीय पद्धतीचा पोशाख करणार आहे, तर आपण काळ्या आणि लाल रंगाची शेरवानी घालणार असल्याचं हसन म्हणाला.
हसन आणि शामिया यांची ओळख वर्षभरापूर्वी दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. हसनने तिला लग्नाची मागणी घातली. तिच्या होकारानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह सोहळा निश्चित झाला.
भारताचा जावई होणारा चौथा क्रिकेटपटू
हसन अली हा भारताचा जावई होणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार झहीर अब्बास (पत्नी सामिना अब्बास), मोहसीन खान (पत्नी – भारतीय अभिनेत्री रिना रॉय) आणि शोएब मलिक (पत्नी – भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा) हे भारताचे जावई होते.