पॅरिस ऑलिम्पिक विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे ती महिला कुस्तीतून बाद ठरली आहे. विनेश सुवर्ण पदक जिंकणार असल्याची शक्यता असतानाच अचानक ही धक्कादायक बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. तर काँग्रेसने विनेशच्या मुद्द्यावरून भाजपला जोरदार टोमणा मारला आहे. विनेश फोगाटने दिल्लीपासून पॅरिसपर्यंत हिंमत दाखवल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
विनेश फोगाटने जगातील तीन अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंना नमवून फायनलमध्ये स्थान बळकट केलं होतं. त्यामुळे विनेश आज देशाला सुवर्णपदक मिळवून देणार असल्याची जोरदार चर्चा होती. विनेशच्या या कामगिरीकडे देशाचंच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष लागलं होतं. पण विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्याने तिला ऑलिम्पिक नियमानुसार अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तिला रजत पदक तरी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हिंमतीची दाद द्यावीच लागेल
विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी त्यावर प्रतिक्रिाय दिली आहे. भारताला गोल्ड मेडल भलेही मिळाले नसेल. पण तिने देशाचं मन जिंकलं आहे. तिला जो पुरस्कार मिळाला पाहिजे, तो मिळत नाहीये, याचं मला दु:ख वाटतंय, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
विनेशने आपलं मन जिंकलं आहे. दिल्लीच्या रस्त्यावर आणि पॅरिसच्या आखाड्यात तिने जे काही केलं, त्याचा देशाला अभिमान आहे. तिने ज्या पद्धतीने हिंमत, ताकद आणि आपली पात्रता सिद्ध केली आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही तिच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तिला आपण कधीच विसरू शकत नाही. टेक्निकली वजनबाबत काय झालं ते मला माहीत नाही. यात कोचचीही जबाबदारी आहे. एवढ्या प्रयत्नानंतरही तिला जो पुरस्कार मिळायला पाहिजे, तो मिळत नाही, याचं मला वाईट वाटतं. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं ही अभिमानाची गोष्ट आहे, असं थररू म्हणाले.
संसदेत पडसाद
दरम्यान, विनेश फोगाट स्पर्धेतून बाद ठरल्याने संसदेत त्याचे पडसाद उमटले. सर्वच खासदारांनी या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ केला. या प्रकणावर क्रीडा मंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली. त्यावर क्रीडा मंत्री आज दुपारी 3 वाजता निवेदन सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं.