Video : ‘कमबॅकसाठी त्याच्या बॅटने खेळलो’, अभिषेक शर्माने शतकी खेळीनंतर केला खुलासा

| Updated on: Jul 08, 2024 | 6:10 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा फेल ठरला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने कमबॅक केलं आणि शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीमागचं रहस्य त्याने उलगडलं आहे.

Video : कमबॅकसाठी त्याच्या बॅटने खेळलो, अभिषेक शर्माने शतकी खेळीनंतर केला खुलासा
Follow us on

टी20 क्रिकेट फॉर्मेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्मासाठी पहिला सामना काही खास ठरला नाही. शून्यावर बाद झाल्याने पदार्पणाच्या सामन्यातच दडपण आलं. मात्र 24 तासात त्याने आपली चूक दुरुस्त केली आणि जबरदस्त कमबॅक केलं. अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची ही पहिलीच शतकी खेळी ठरली. अवघ्या 24 तासात त्याने 0 ते 100 असा धावांचा प्रवास केला. त्याच्या खेळीमागचं रहस्यही त्याने उलगडलं आहे. शतकी खेळीमागे खास बॅट असल्याचा खुलासा त्याने केला आहे. ही बॅट दुसरी तिसरी कोणाची नसून कर्णधार शुबमन गिलची होती. त्याच्या बॅटमुळेच कमबॅक करता आलं असं अभिषेक शर्मा म्हणाला.

“पहिला सामना हरल्यानंतर मला वाटलं की आज माझा दिवस आहे. मी शेवटपर्यंत खेळेन. पुढच्या सामन्यात बदल करण्यासाठी फार काही वेळ नव्हता. कारण दुसऱ्या दिवशीच सामना होता. मला जेव्हा वाटलं की या बॉलरला मारू शकतो. त्या षटकात मी पूर्णपणे प्रयत्न केला. मी एका अशा वळणावर आलो होतो की मला करून दाखवण्याची वेळ आली होती. मी ऋतुराजशी पहिल्यांदा बोललो, तेव्हा तो सुद्धा मला हेच बोलला की समोर आला की फटकेबाजी कर. बॉल्सबाबत फार काही विचार करू नको.”, असं अभिषेक शर्मा म्हणाला.

अभिषेक शर्माने शुबमन गिलच्या बॅटबाबतही खुलासा केला. “अंडर 14 पासूनच सुरु आहे. मी जेव्हा त्याच्या बॅटने खेळतो. तेव्हा चांगलंच झालं आहे. आजपण मी त्याच्याच बॅटने खेळलो. त्याची बॅट कशी मिळाली माझं मला माहिती..कोणी बॅट सहज देत नाही. हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय असतो. कमबॅकसाठी त्याच्या बॅटने खेळावं लागेल, असं वाटलं. शुबमन गिलचे खरंच मनापासून आभार. त्याने मला त्याची बॅट दिली. योग्य वेळेवर दिली. खरंच मला त्याची गरज होती.”, असं अभिषेक शर्माने पुढे सांगितलं.