मुंबई : ऑस्ट्रेलिया दौर्यावरील खराब फॉर्ममुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉला टीम इंडियामधून वगळण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी पृथ्वी अॅडलेडला एका कसोटी सामन्यात खेळला होता, पण त्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु आता पृथ्वी शॉने आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत नाबाद शतकी खेळी करत मुंबईच्या संघाला शानदार विजय मिळवून देत स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी शॉने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकलं आहे. त्याने 89 चेंडूत 15 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 105 धावा फटकावल्या. यामुळे मुंबईने दिल्लीला सात गडी राखून पराभूत केलं आहे. शॉच्या शतकामुळे दिल्लीने दिलेलं 212 धावांचे लक्ष्य मुंबईने 32 व्या षटकात गाठलं. (Prithvi Shaw century against Delhi in Vijay Hazare trophy)
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये 7 गड्यांच्या बदल्यात 211 धावा जमवल्या. 212 धावांचे आव्हान घेऊन मुंबईची सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. 23 चेंडूत 8 धावा करत जयस्वाल स्वस्तात परतला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरसह पृथ्वीने दुसर्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. अय्यर 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 चेंडूत 39 धावांवर असताना बाद झाला. अय्यर आणि शॉ दोघेही आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलसाठी एकत्र खेळतात. अय्यर बाद झाल्यावर पृथ्वी शॉने सूर्यकुमार यादवसोबत मोठी भागीदारी रचली. दोघांनी वेगाने धावा जमवत मुंबईला विजयासमीप नेले. दरम्यान, शॉने 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचवेळी सूर्याने 32 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. या सामन्याच्या एक दिवस आधीच सूर्यकुमारची भारताच्या टी -20 संघात निवड झाली आहे.
अर्धशतक करुन सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर पृथ्वीने शिवम दुबेच्या मदतीने सामना जिंकला. दरम्यान, शॉने 89 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 105 धावा फटकावल्या. मुंबईने 31.5 षटकात 216 धावा फटकावल्या. या विजयासह विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने त्यांच्या गुणांचं खातं उघडलं आहे. तर दिल्लीने पराभवासह या करंडकाची सुरुवात केली आहे. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराश केले. सलामीवीर शिखर धवन शुन्यावर धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या 24 वर्षीय हिम्मत सिंह याच्या नाबाद 106 आणि शिवांक वशिष्ठ याच्या 55 धावांच्या जोरावर दिल्लीने द्विशतकी आकडा गाठला. या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
ऑस्ट्रेलिया दौर्यावरील खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. शुबमन गिलने त्याची जागा घेतली आहे. या दौर्यापूर्वी शॉ आयपीएलमध्येही अपयशी ठरला होता. आयपीएलमध्ये तो 13 सामन्यात केवळ 228 धावा करु शकला होता. शेवटी त्याला आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघानेदेखील वगळले होते.
हेही वाचा
राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटवर सारा फिदा, म्हणते ‘असा शॉट मला पण शिकव!’
सेहवाग, गांगुली-धोनीपेक्षा अधिक रन्स, तरीही संघाबाहेर, मात्र पुढे थेट ऑस्ट्रेलियाच्या गोटात!
(Prithvi Shaw century against Delhi in Vijay Hazare trophy)