मुंबई : भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा पराभव झाला असला तरीही आयसीसीकडून पैशांचा पाऊस पाडला जाणार आहे. कारण, सेमीफायनलपर्यंत मजल मारणाऱ्या संघालाही बक्षीस दिलं जातं. विश्वचषक 2019 साठी आयसीसीने यावेळी 70 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. या 70 कोटींपैकी भारतीय संघाला साडे सात कोटी रुपये मिळतील. आयोजकांच्या मते, पराभवानंतरतही भारतीय संघाला वेगवेगळ्या आधारावर 7.60 कोटी रुपये मिळताली.
आयसीसीच्या नियमानुसार, सेमीफायनलपर्यंत मजल मारणाऱ्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 5.5 कोटी रुपये बक्षीस दिलं जातं. लीग फेजमध्ये एका सामन्यासाठी विजेत्या संघाला 28 लाख रुपये दिले जातात, तर सामना रद्द झाल्यानंतर हे बक्षीस 14-14 लाख रुपये असं दिलं जातं.
यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलपर्यंत मजल मारल्यामुळे 5.50 कोटी रुपये, सात सामने जिंकल्यामुळे 1.96 कोटी रुपये (7 सामन्यांसाठी 28-28 लाख) आणि न्यूझीलंडविरुद्ध रद्द झालेल्या सामन्याचे 14 लाख रुपये मिळतील. म्हणजे एकूण बक्षीस हे 7.60 कोटी रुपये असेल. तर विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 28 कोटी आणि उपविजेत्याला 14 कोटी रुपये बक्षीस दिलं जाईल.
भारतीय संघ अव्वल स्थानी
या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी सुरुवातीपासूनच दमदार होती. इंग्लंडविरुद्धचा अपवाद वगळता भारताने एकही सामना गमावला नाही. परिणामी 9 सामन्यात 15 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये खराब फलंदाजीमुळे भारतीय संघाचं फायनल खेळण्याचं आणि विश्वविजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.