मुंबई : क्रिकेट जगतात ‘द वॉल’ म्हणून राहुल द्रविड प्रसिद्ध आहे. मात्र आता त्याचा मुलगाही त्याच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवत आहे (Samit Dravid Double Century). राहुल द्रविडचा मुलगा समितने दोन महिन्यांच्या कालावधीत दोन द्विशतकं ठोकली आहेत. नुकतंच त्याने बंगळुरुमध्ये त्याच्या ‘माल्या आदिती इंटरनॅशनल’ शाळेकडून (MAI) खेळताना द्विशतक झळकावलं. 14 वर्षाखालील ‘बीटीआर शिल्ड अंडर-14 ग्रुप -1, डिव्हिजन II टूर्नामेंट’दरम्यान समित द्रविडने फक्त 144 चेंडूंत 211 धावा काढल्या. यामध्ये 24 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता (Samit Dravid).
समित द्रविडच्या द्विशतकाच्या जोरावर त्याच्या संघाने 50 षटकांत 3 विकेट गमावत 386 धावांचं आव्हान उभं केलं. याविरोधात ‘बीजीएस नॅशनल पब्लिक’ शाळेचा संघ फक्त 254 धावा काढू शकला. त्यामुळे या सामन्यात एमएआय संघ 132 धावांनी विजयी झाला.
समित द्रविडने यापूर्वीही 20 डिसेंबर 2019 रोजी 14 वर्षाखालील आंतर-विभागीय स्पर्धेत ‘वाईस प्रेसिडेंट इलेव्हन’कडून खेळताना धारवाड विभागाविरोधात 201 धावा केल्या होत्या.
समित द्रविड गेल्या वर्षीच्या शेवटी आपल्या धुवांधार फलंदाजीमुळे चर्चेत होता. त्याने आंतर-विभागीय स्पर्धेत 3 विकेटसोबत दोन सामन्यांमध्ये 295 धावा काढल्या होत्या. त्यापूर्वी समितने 2016 मध्ये बंगळुरु युनायटेड क्रिकेट क्लबकडून खेळताना फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलविरोधात 125 धावा केल्या होत्या. तेव्हाही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.
समितचा आतापर्यंतचा खेळाचा आलेख पाहता तो वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं दिसतं. राहुल द्रविडचं नाव जगातील बड्या फलंदाजांमध्ये घेतलं जातं. राहुल द्रविडने त्याच्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 13,288 धावा, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,889 धावा केल्या आहेत.