लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात पावसाचा खोळंबा अनेक सामन्यांमध्ये आलाय. आतापर्यंत काही सामने पावसामुळे रद्दही करावे लागले. भारतीय संघाचा अष्टपैलू मराठमोळ्या केदार जाधवने या पावसाला महाराष्ट्रात जाण्याची साद घातली आहे. माझ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे, तिथे जा, अशी साद केदार जाधवने घातली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसाची खरी गरज महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना आहे, इथे नको, महाराष्ट्रात जा, असा व्हिडीओ मैदानात शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचं मन जिंकून घेताना दिसतोय.
मराठमोळा #केदार #जाधव ? थेट #इंग्लंड येथून
________________#kedarjadhav #maharashtra#Pandurang_Patil_Savane pic.twitter.com/lOv0l00PeY— PANDURANG UATTAMRAO SAVANE (@savanepatil9933) June 12, 2019
इंग्लंडमध्ये अनेक शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक सामने रद्द करावे लागले आहेत. भारतातही केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी पुढील वाटचाल संथ झाली आहे. शिवाय वायू नावाचं चक्रीवादळ आल्याने पाऊस आणखी लांबला. मराठवाडा, विदर्भ हा दुष्काळग्रस्त भागाला अजूनही दिलासा मिळालेला नाही. धरणांची पातळी तळाला गेली आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून केदार जाधवने वरुणराजाला साद घातली. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने चार गुण नावावर केले आहेत. आता तिसरी लढाई न्यूझीलंड आणि त्यानंतर 16 तारखेला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना होईल. शिखर धवनची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब असली तरी इतर खेळाडूंच्या फॉर्ममुळे भारतीय संघ पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे.