नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी सलामीवीर डब्ल्यू. व्ही. रमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर गॅरी कर्स्टन हे देखील प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत होते. 53 वर्षीय रमन हे सध्या बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
“कर्स्टन हे प्रशिक्षक निवड समितीची पहिली पसंत होते. पण रमन यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. कारण, कर्स्टन हे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचे प्रशिक्षक पद सोडण्यास तयार नव्हते”, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
पॅनेल बोर्डला कर्स्टन, रमन आणि वेंकटेश प्रसाद अशी तीन नावे देण्यात आली होती, त्यापैकी समितीने रमन यांची निवड केली. निवड समितीत कपील देव, अंशुमन गायकवाड आणि एस रंगास्वामी होते.
रमन यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने आणि 27 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी रणजी ट्रॉफीत तामिळनाडू आणि बंगालसारख्या मोठ्या संघाना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी भारताच्या अंडर 19 संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. 1992-93 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यारदम्यान शतक ठोकणारे पहिले भारतीय म्हणूनही ओळखले जाते.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी कर्स्टन, रमण आणि प्रसाद यांच्या व्यतीरिक्त 28 अर्ज आले होते.