Ranji Trophy Final नागपूर: फैज फजलच्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. विदर्भने अंतिम सामन्यात जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाचा 78 धावांनी पराभव केला. विदर्भचा आदित्य सरवटे आजच्या सामन्याचा हिरो ठरला. आदित्यने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 विकेट घेऊन, सौराष्ट्रचा डाव गुंडाळण्याचा सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भचा पहिला डाव 312 धावांत आटोपला होता.
मग पुजारासारखा भक्कम फलंदाज असलेल्या सौराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद 307 असं उत्तर दिलं. त्यानंतर विदर्भने दुसऱ्या डावात आदित्य सरवरटेच्या सर्वाधिक 49 धावांच्या जोरावर सर्वबाद 200 अशी मजल मारली होती. त्यामुळे सौराष्ट्रला विजयासाठी अवघ्या 206 धावांची गरज होती. मात्र डावखुऱ्या आदित्य सरवटेच्या फिरकीसमोर सौराष्ट्रचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. आदित्यने 24 षटकात 59 धावा देत 6 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यामुळे दुसऱ्या डावात सौराष्ट्रचा संघ अवघ्या 127 धावांत गारद झाला.
या सामन्यातील जबरदस्त कामगिरीमुळे आदित्य सरवटेला सामनावीराचा किताब देण्यात आला. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली फैज फजलच्या विदर्भने दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकला.
आदित्य सरवटेने या सामन्याच्या दोन्ही डावात सौराष्ट्रचा हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाद केलं. पुजाराने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 0 धावा केल्या.
दुसरीकडे विदर्भचा हुकमी वासिम जाफरलाही या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. जाफर पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात 11 धावा करुन बाद झाला. जाफरने यंदाच्या रणजी मोसमात अकरा सामन्यांमध्ये 69.13च्या सरासरीने 1037 धावांचा रतीब घातला.
नितीन गडकरींकडून अभिनंदन
दरम्यान, या विजयानंतर विदर्भ संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विदर्भाचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या विजयानंतर अभिनंदन केलं. “दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकल्याबद्दल विदर्भ क्रिकेट संघाचं अभिनंदन. कर्णधार फैज फजल आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत कौतुकास पात्र आहेत. तुमचा विजय असंख्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेलच, शिवाय विदर्भाच्या क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देणारा ठरेल” असं ट्विट गडकरींनी केलं.
Congratulating Vidarbha cricket team for winning Ranji Trophy for the second consecutive time. Captain Faiz Fasal and Coach C. Pandit deserve an applause.
Your achievement will not only inspire many more players, it will also refresh the entire sports fraternity of the region. pic.twitter.com/xRuI1KNq9l— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 7, 2019
Many congratulations Vidarbha for becoming Ranji Trophy Champions for a second successive time. Congratulations to @faizfazal and the boys. A final to remember for Sarwate. pic.twitter.com/90o1v4eKyU
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 7, 2019
Congratulations Vidarbha on being deserving winners and for retaining the Ranji Trophy. May you keep on going from strength to strength and cherish this special moment.
— VVS Laxman (@VVSLaxman281) February 7, 2019